कँन्टोन्मेंट प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By Admin | Updated: January 10, 2015 00:49 IST2015-01-10T00:49:03+5:302015-01-10T00:49:03+5:30
कँटोन्मेंट बोर्डाचा प्रचार आज सायंकाळी ५ च्या सुमारास संपला. विविध उमेदवारांनी सकाळपासून प्रचारफेऱ्या काढत आपापल्या भागात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

कँन्टोन्मेंट प्रचाराच्या तोफा थंडावल्या
पुणे : कँटोन्मेंट बोर्डाचा प्रचार आज सायंकाळी ५ च्या सुमारास संपला. विविध उमेदवारांनी सकाळपासून प्रचारफेऱ्या काढत आपापल्या भागात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारामुळे कँटोन्मेंट परिसर दणाणून गेला होता.
विविध ८ वॉर्डांमध्ये राजकीय पक्षांचे २९ उमेदवार असून, अपक्षांची संख्या त्यापेक्षा १० ने जास्त ३९ आहे. २ वॉर्डांमधील चौरंगी, पंचरंगी लढती वगळता अन्य ६ वॉर्डांमध्ये ६ ते १२ संख्येने उमेदवार नशीब अजमावित आहेत.
शिवसेना, भाजपची तुटलेली युती आणि मनसेने निवडणूक न लढविण्याचा केलेला निर्णय यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांचे उमेदवार तसेच रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंंब्यावर उभे असलेले २ उमेदवार आणि शिवसेनेने केवळ ५ वॉर्डांमध्ये उभे केलेले उमेदवार असे चित्र पुणे कँटोन्मेंटमध्ये आहे.
आज सायंकाळी ५ नंतर प्रचार समाप्त होत असल्याने उमेदवारांनी प्रचार वाहनांवरील झेंडे, बॅनर्स काढून टाकले. उमेदवारांनी प्रचारफलक काढून टाकावेत, अशाही सूचना निवडणूक यंत्रणेने केल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी मात्र उशिरानेच झाली. (प्रतिनिधी)
४प्रादेशिक पातळीवरील नेत्यांच्या सभांविनाच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचार करावा लागला. केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर पुण्यात असूनही त्यांची जाहीर सभा होऊ शकली नाही. पूर्वी जाहीर झाल्याप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार किंंवा खासदार रामदास आठवले यांच्याही प्रचारफेऱ्या होऊ शकल्या नाहीत. काँग्रेसच्या उमेदवारांनीही स्थानिक प्रसिद्ध नेत्यांसोबत प्रचारफेऱ्या काढून वेळ भागवून नेली. अपक्ष उमेदवारांपैकी काहींनी चित्रपटतारे-तारकांना प्रचारात आणून रंग भरण्याचा प्रयत्न केला.
वॉर्ड ८ मध्ये राजकीय पक्षाच्या ४,
अपक्ष ६ महिला उमेदवार रिंगणात
पुणे : वॉर्ड क्र. ८ या महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डामध्ये महात्मा गांधी रस्त्याचा काही भाग, शिंंपी आळी, मेहेर मोहल्ला, कामाठीपुरा, ताबूत स्ट्रीट या परिसराचा समावेश आहे. संवेदनशील वॉर्डमध्ये त्याची गणना असून १० उमेदवार रिंगणात आहेत.
४९९८ मतदारसंख्या असलेल्या या वॉर्डात ५ मतदान केंद्रे असून, लेडी हवाबाई स्कूलमध्ये ३, तर मोलेदिना स्कूलमध्ये २ केंद्रे आहेत. भाजपच्या प्रियांका श्रीगिरी या खासगी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून पूर्वी सेवेस होत्या. विद्यमान सदस्य मंजूर शेख यांच्या पत्नी साबिरा शेख यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या रोहिणी कोल्हाळ आणि राष्ट्रवादीच्या यास्मिन कुरेशी यांच्यासह अन्य ६ अपक्ष उमेदवार असून, यास्मिन शेख, नसिम शेख, मन्ना शेख, झाकिया शेख, स्मिता मलिक, शैनाज मेमन अशी अपक्ष उमेदवारांची नावे आहेत.
पडझड झालेल्या घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न याही भागात असून, पूर्वजांच्या मालमत्ता वंशजांच्या नावावर केल्या जात नसल्याचा महत्त्वाचा प्रश्न असून, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, खराब रस्ते अशा काही समस्या असल्याचे नागरिकांचे गाऱ्हाणे आहे.