कॅन्टोन्मेंटकडून कारवाईची मोहिम

By Admin | Updated: March 29, 2017 02:10 IST2017-03-29T02:10:58+5:302017-03-29T02:10:58+5:30

खडकी येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत मागील सहा महिन्यांपासून अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सुरू आहे

Cantonment Action Plan | कॅन्टोन्मेंटकडून कारवाईची मोहिम

कॅन्टोन्मेंटकडून कारवाईची मोहिम

खडकी : येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत मागील सहा महिन्यांपासून अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सुरू आहे. कारवाईत खडकीतील सुमारे ८० टक्के अतिक्रमण काढण्यात आले. मात्र, इथून हटविण्यात आलेल्या व्यावसायिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मानाजीबाग परिसरात बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. येथील अतिक्रमण हटविण्यात पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र कुचराई करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अतिक्रमण वाढत असल्याने प्रशासनावर चहूबाजूंनी टीका होत होती. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून खडकी परिसरातील अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र इथून हटविण्यात आलेल्या व्यावसायिकांनी पुणे महानगरपालिका हद्द जिथून सुरू होते, त्या रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ स्वयंघोषित फळ मार्के ट तयार केले आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कारवाई करते म्हणून सर्व फळविक्रेते पुणे महापालिकेच्या हद्दीत रस्त्यावर हातगाड्या लावतात. या हातगाड्या आडव्या-तिडव्या लावल्याने वाहतूककोंडी होत असते. मात्र महापालिकेचा अतिक्रमण विभाग डोळे झाकून गप्प बसत आहे. त्यामुळे या हातगाडीधारकांचे अतिक्रमण विभागाशी आर्थिक हितसंबंध आहेत की काय, अशी शंका येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड, येरवडा, कॅम्प, खराडी, कोरेगाव पार्क, मुंढवा, हडपसर या ठिकाणी जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
मात्र या अतिक्रमणामुळे वाहतुकीस रस्ता अपुरा पडतो व त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलीस विभागही याकडे कानाडोळा करीत असल्याने दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. (वार्ताहर)

Web Title: Cantonment Action Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.