उमेदवारी की, पत्ता कट याची उत्सुकता!
By Admin | Updated: January 29, 2017 04:11 IST2017-01-29T04:11:06+5:302017-01-29T04:11:06+5:30
जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी कोणाला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले

उमेदवारी की, पत्ता कट याची उत्सुकता!
वडगाव मावळ : जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी कोणाला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी दंड थोपटले असून भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे.
मावळ तालुका हा पुणे जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश नेते राजकारणात तरबेज आहेत. तालुक्यात अनेक राजकीय नेत्यांनी आपले नशीब आजमावले आहे. तालुक्यांतर्गत जिल्हा परिषदेचे पाच, तर पंचायत समितीचे दहा गण आहेत. राजकीय उलथापालथ करण्याची ताकत तालुक्यात असल्याने प्रत्येक गण आणि गटात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त प्रमाणत आहे. केंद्र, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी या पक्षांकडे इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली आहे. काही दिवसांतच कोणाला मिळणार उमेदवारी, कोणाला डच्चू भेटणार हे स्पष्ट होणार असल्याने राजकीय भूमिकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा कडून ७३ उमेदवारांनी तर जिल्हा परिषदेसाठी २२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. कॉंग्रेस पक्षामध्ये देखील पंचायत समितीसाठी २८ तर जिल्हा परिषदेसाठी ४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. शिवसेनेकडे पंचायत समितीसाठी ५० तर जिल्हा परिषदेसाठी १० उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यातील काही उमेदवारी आपल्याला तिकीट भेटणारच या विश्वासाने सोशल मीडियावर तसेच आपापल्या गणातील नागरिकांना देवदर्शन, सहली, महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा असे कार्यक्रम घेत आहे.
अनेकांनी काही दिवसापूर्वीच प्रचाराला सुरवात केली आहे. गावभेटी देखील जोरात सुरु केल्या आहेत. अर्जमाघारीच्या मुदतीपर्यंत सर्व चित्र विशेषत: बंडखोरी होते की नाही हेही स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, कॉँग्रेस, मनसे, स्वाभिमानी रिपब्लिकन आदी पक्ष रिंगणात असतील. मात्र, अनेक गट, गणात चौरंगी-पंचरंगी लढती होणार असल्याचे बोलले जाते. तगडा बंडखोर असल्यास यातील रंग वाढणार आहेत. (वार्ताहर)
स्वबळाची अंतिम तयारी
अद्याप तालुक्यात कोणत्याही पक्षात युती अथवा आघाडी न झाल्यामुळे सर्व पक्ष स्वबळावर लढवण्याच्या अंतिम तयारीत आहेत. तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत वडगाव खडकाळा व इंदोरी -सोमाटणे गट हा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. हा गट सर्वसाधारण जागेसाठी असल्यामुळे या गटात सर्वच पक्षातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रवादी-भाजपात येथे टक्कर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. टाकवे-वडेश्वर सर्वसाधारण स्री तर कुसगाव -वाकसई व महागाव -चांदखेड हा अनुसूचित जमाती स्रीसाठी राखीव झाल्यामुळे या गटातील उत्साह काहीसा कमी झाल्याचे दिसत आहे.
इच्छुक अधिक
मावळ पंचायत समिती दहा गणातील टाकवे, वडेश्वर सर्वसाधारण जागेसाठी तर खडकाळा, महागाव इतर मागास वर्ग स्री ,कुसगाव ,चांदखेड सर्वसाधारण स्री इंदोरी अनुसूचित जाती स्री वाकसाई अनुसूचित जमाती स्री तर वडगाव इतर मागास वर्ग सर्वसाधारण जागेसाठी खुला राहिला आहे. त्यामुळे या गणात देखील ग्रामीण व शहरी भागात इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. दोनच दिवसात कोणाला भेटणार उमेदवारी व कोणाला भेटणार डच्चू हे स्पष्ट होणार आहे.