सिडकोतील भ्रष्टाचाराची करा आॅनलाइन तक्रार

By Admin | Updated: March 4, 2015 23:11 IST2015-03-04T23:11:26+5:302015-03-04T23:11:26+5:30

अधिकाऱ्यांमार्फत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोने नागरिकांसाठी आॅनलाइन तक्रारीची सुविधा उपलब्ध केली आहे.

Cadco corruption online report | सिडकोतील भ्रष्टाचाराची करा आॅनलाइन तक्रार

सिडकोतील भ्रष्टाचाराची करा आॅनलाइन तक्रार

नवी मुंबई : अधिकाऱ्यांमार्फत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोने नागरिकांसाठी आॅनलाइन तक्रारीची सुविधा उपलब्ध केली आहे. या वेबलिंकवर तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय राखले जाणार आहे. त्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार करण्यास नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
सिडको प्रशासनाचा कारभार पारदर्शक व दर्जेदार व्हावा याकरिता सिडको महामंडळाने दक्षता विभागाची स्थापना केली आहे. या पथकाद्वारे सिडकोत भ्रष्टाचारमुक्त कामकाज व्हावे म्हणून अनेक निर्णय घेतले गेले आहेत. शिवाय सिडकोच्या संकेतस्थळावर स्वतंत्र वेबलिंकही सुरू करण्यात आली आहे. सिडकोचा एखादा अधिकारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत लाच मागत असेल तर त्याच्याविरोधात नागरिकांनी या वेबलिंकवर तक्रार करावी, असे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी केले आहे. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेबलिंक ही प्रभावी यंत्रणा असल्याने जनतेला समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. तर एखाद्या नागरिकाला आपली तक्रार थेट करायची असल्यास ई-मेलवरही ते तक्रार पाठवू शकतात. या प्रक्रियेत तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांच्या नावात गोपनीयता ठेवली जाणार आहे. त्यामुळे गैरकारभार करणाऱ्या सिडकोमधील एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी वेबलिंकवर अथवा ई-मेलवर त्या नोंदवाव्यात, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cadco corruption online report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.