दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या बसना अपघाताचा धोका
By Admin | Updated: August 12, 2015 04:36 IST2015-08-12T04:36:10+5:302015-08-12T04:36:10+5:30
दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या बसला हवेचा स्वतंत्र सिलिंडर नसल्याने ब्रेकवर ताण येतो. त्यामुळे बऱ्याचदा बसचा ब्रेक लागत नाही. याबाबत बसचालकांनी पीएमपी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या बसना अपघाताचा धोका
पुणे : दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या बसला हवेचा स्वतंत्र सिलिंडर नसल्याने ब्रेकवर ताण येतो. त्यामुळे बऱ्याचदा बसचा ब्रेक लागत नाही. याबाबत बसचालकांनी पीएमपी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, एखादा अपघात घडल्यानंतरच पीएमपी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
शहरातील बीआरटी मार्गावर चालविण्यासाठी दोन्ही बाजूंनी उघडणाऱ्या बस घेण्यात आल्या आहेत. तसेच ठेकेदाराकडून काही बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. सध्या चालू असलेल्या बीआरटी मार्गावर बसच्या उजव्या बाजूचे दरवाजे उघडले जात नव्हते; मात्र संगमवाडी ते विश्रांतवाडी हा बीआरटीचा मार्ग सुरू होत आहे. या मार्गावर बसच्या उजव्या बाजूचे दरवाजे उघडले जाणार आहेत.
उजव्या बाजूचा दरवाजा उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी हवेचा स्वतंत्र सिलिंडर बसविणे आवश्यक आहे. तसे टेंडरमध्येही नमूद करण्यात आले होते; मात्र ६५० बसना हा स्वतंत्र सिलिंडर बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे बसमध्ये असलेल्या एकाच सिलिंडरवर ताण येऊन ब्रेकवर परिणाम होत नाही. एकाच सिलिंडरवरून बसच्या दरवाजांची उघडझाप झाल्यास ब्रेकची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
या बसना दरवाजे उघडण्यासाठी स्वतंत्र सिलिंडर बसविण्याची मागणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हृषीकेश बालगुडे यांनी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)