बीएसएफआयचे अध्यक्ष राजन खिंवसरा यांचा ‘पीवायसी’तर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:31 IST2021-02-20T04:31:17+5:302021-02-20T04:31:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियाच्या (बीएसएफआय) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजन खिंवसरा यांचा पीवायसी ...

बीएसएफआयचे अध्यक्ष राजन खिंवसरा यांचा ‘पीवायसी’तर्फे सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बिलियर्ड्स आणि स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियाच्या (बीएसएफआय) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजन खिंवसरा यांचा पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या कार्यकारी समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
बीएसएफआयच्या अध्यक्षपदी निवड झालेले खिवंसरा हे महाराष्ट्रातील तसेच पुण्यातील पहिलेच व्यक्ती आहेत. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे व अन्य समिती सदस्य या वेळी उपस्थित होते.
परांजपे म्हणाले की, पुण्यातील क्यू स्पोर्टस्मध्ये पीवायसी हिंदू जिमखानाचा फार मोठा वाटा आहे. क्यू स्पोर्ट्मध्ये आपले फार मोठे योगदान देणारे राजन खिंवसरा आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे नातेही अतूट आहे. राजन खिंवसरा म्हणाले की, पीवायसी या माझ्या दुसऱ्या घरी आणि कुटुंबातच माझा सत्कार होत असल्याची माझी भावना आहे. पीवायसी हिंदू जिमखाना आणि मी हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. मी आणि पीवायसी क्लबने १४ राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. देशामध्ये क्यू क्रीडा प्रकारामध्ये गुणवान खेळाडूंची नवी पिढी तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबमध्ये क्यू स्पोर्टची अॅकॅडमी उभी करण्याचा आमचा मनोदय असून यासाठी आवश्यक मदत केली जाईल.
राजन खिंवसरा यांनी आत्तापर्यंत बीएसएफआयचे उपाध्यक्षपद दोन वेळा भूषविले आहे. महाराष्ट्र बिलियर्ड्स व स्नूकर संघटनेच्या अध्यक्षपदी ते २०१४-१७ या दरम्यान होते. तसेच संघटनेच्या उपाध्यक्षपद त्यांनी २००८ ते २०११ आणि २०११ ते २०१४ या कालावधीमध्ये भूषविले आहे.