सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद बेंद्रे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 01:45 PM2018-11-11T13:45:42+5:302018-11-11T13:49:14+5:30

शिवाजीनग गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय २७) यांच्यावर रविवारी भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

bsf jawan prasad bendre passes away | सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद बेंद्रे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद बेंद्रे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

Next

पुणे : शिवाजीनग गावठाण येथे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद प्रकाश बेंद्रे (२७) यांच्यावर रविवारी भावपूर्ण वातावरणात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले होते.  त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले. शिवाजीनगर गावठाण येथील राहत्या घरापासून फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. शिवाजीनगर गावठाणाबरोबर शहरातील विविध भागातील नागरिक अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वैकुंठ स्मशानभूमीत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना हवेत गोळीबार करुन मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  प्रसाद बेंद्रे यांच्या मागे पत्नी, आई व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. चार वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. प्रसाद यांचा दौंड येथील सायली डहाळे यांच्याशी जुलै २०१६ मध्ये विवाह झाला होता.

बेंद्रे कुटुंबीय शिवाजीनगर गावठाणात पंचमुखी मारुती परिसरात वास्तव्यास आहेत. शनिवारी प्रसाद यांचे निधन झाल्याची माहिती नातेवाइकांना समजली. त्यानंतर परिसरातील नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. पोलीस वसाहतीतील हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर मॉडर्न हायस्कुलमध्ये पुढील शिक्षण झाले. बारावीनंतर ते बीएसएफच्या १८२ व्या तुकडीत दाखल झाले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. नुकतीच त्यांची मणिपूर, इम्फाळ येथील चीन सीमेवर बदली झाली.  गणपतीत ते पुण्यात आले होते. हीच त्यांची अखेरची भेट ठरली़ गणपतीनंतर त्यांची मणिपूरला बदली झाली. सुमारे ५ दिवसांपूर्वी त्यांना न्युमोनिया झाला होता. भाऊबिजेनिमित्त त्यांच्याशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे शुक्रवारी बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी आता श्वसनाचा थोडा त्रास होत आहे. हॉस्पिटलमधून लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचे एका पाठोपाठ दोन झटके आले. त्यातच त्यांचे निधन झाले होते. 

Web Title: bsf jawan prasad bendre passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे