पुणे : एरंडवणा परिसरातील घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्रास देत असल्याच्या कारणावरुन भाऊ व बहिणीने दोघांच्या मदतीने सख्या भावाचा खून केला. त्याला कॅनॉलमध्ये दिल्याचा हा प्रकार तब्बल ५ वर्षांनी उघडकीस आला आहे. पंकज चंद्रकांत दिघे (वय २३, रा. भालेकर चाळ, एरंडवणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सुहास दिघे, आश्विनी आडसूळ, प्रशांत यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, महेश बाबूराव धनपावडे (वय ३७, रा. देशमुखवाडी, शिवणे) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार १४ ते १८ मार्च २०१७ दरम्यान घडला होता.
अधिक माहितीनुसार, फुरसुंगी गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टच्या उसाचे शेताजवळील कॅनॉलमध्ये दि. १८ मार्च २०१७ रोजी एक मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. त्याचवेळी डेक्कन पोलीस ठाण्यात पंकज दिघे याची बेपत्ता म्हणून तक्रार नाेंदवण्यात आली होती. याबाबत तपास करत असताना तसेच साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत घराच्या वादातून पंकज दिघे याला कॅनॉलच्या पाण्यात ढकलून त्याचा खून केल्याची माहिती मिळाली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे म्हणाल्या, दिघे यांचे एरंडवणा येथे एका चाळीत घर आहे. सुहास दिघे आणि त्यांची बहीण आश्विनी आडसूळ यांचा भाऊ पंकज दिघे हा त्यांना राहते घर स्वत:च्या नावावर करण्याकरिता त्रास देत होता. त्या कारणावरून त्यांनी प्रशांत व महेश धनावडे यांच्यासमवेत कट रचला. १४ मार्च २०१७ रोजी सायंकाळी पंकज याला तवेरा गाडीत घालून पळवून नेले. गाडीत मारहाण केली. त्याला हडपसर येथील कॅनॉलमध्ये ढकलून दिले. त्यानंतर पाच दिवसांनी सुहास दिघे याने डेक्कन पोलीस ठाण्यात भाऊ पंकज दिघे हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याच्या अगोदरच हडपसर पोलिसांना फुरसुंगी येथे एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्याची त्यावेळी ओळख पटली नव्हती.
अन् दिली गुन्ह्याची कबुली
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे व त्यांच्या सहकार्यांना पंकज दिघे याचा खून झाल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतल्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात १९ मार्च २०१७ रोजी पंकज दिघे हा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यावरून अनोळखी मृतदेहाची माहिती गोळा केल्यावर हडपसर मधील एक अनोळखी मृतदेहाचे वर्णन पंकज याच्याशी मिळते जुळते असल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी महेश धनावडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने या सर्व प्रकाराची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील तपास करीत आहेत.
मृतदेहाची ओळख पटवून घेण्याचा झाला नाही प्रयत्न
बेपत्ता, अनोळखी मृतदेहाचा वेळीच तपास न झाल्याने गेली ५ वर्षे खुनाचा हा प्रकार उघडकीस आला नव्हता. सध्या अनेक साधने उपलब्ध असतानाही एकाच शहरातील बेपत्ता आणि अनोळखी मृतदेह याची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला नाही.
घरफोडीच्या आरोपीकडून खुनाचा गुन्हा उघड
गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाचे पोलीस हवालदार राजेंद्र मारणे व पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व सहकाऱ्यांनी सुहास चंद्रकांत दिघे (वय ३०, रा. भालेकर चाळ, एरंडवणा) आणि अनिल बाबू बावधने (वय २३, रा. सरगम सोसायटी, वारजे जकातनाका, कर्वेनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील ५ लाख १२ हजारांचे दागिने हस्तगत केले. याची चौकशी करीत असताना सुहास दिघे याने आपला भाऊ पकंज दिघे याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.