पुणे: प्रेमभंगातून चिडलेल्या तरुणाने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बाणेर येथे घडली आहे. डिलिव्हरी बॉयच्या वेशात कंपनीत आलेल्या आरोपीने २४ वर्षीय तरुणीवर पिस्तुल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पिस्तुलातून गोळी न सुटल्याने तरुणी बचावली. या प्रकरणी बाणेरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ ने आरोपीला अटक केली आहे.
यातील २४ वर्षीय तरुणी एमबीए अभ्यासक्रम करत असून, बाणेर येथील एका खासगी कंपनीत ती इंटर्नशिप करते. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ती कंपनीच्या आवारात प्रवेश करत होती. त्याचवेळी आरोपीने डिलिव्हरी बॉयचा वेश घालून व तोंडाला मास्क लावून तिला अडवलं. बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तरुणीने नकार दिल्याने आरोपी संतापला. त्याने खिशातून पिस्तुल काढून तरुणीवर रोखले आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळेत गोळी सुटली नाही. त्यानंतर तरुणीने मोठ्याने आरडाओरडा केल्याने कंपनीतील कर्मचारी व सुरक्षारक्षक धावून आले. त्यावेळी आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने बाणेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तपास केला असता 2022 पासून आरोपी आणि पीडित तरुणी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाले. यामुळे संतप्त होऊन आरोपीने हा धक्कादायक प्रकार घडवला. तो सध्या एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने आरोपीला काही तासांतच बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले असून, त्याच्याकडून हत्यार कुठून आणले, त्यामागील हेतू काय, याचा तपास सुरू आहे.