साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:16+5:302021-04-11T04:10:16+5:30

--- बारामती : बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ...

Breaking the chain will save many lives | साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचतील

साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचतील

---

बारामती : बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक’ शनिवारी (दि.१०) पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपालिका मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, सद्यस्थितीत बारामती तालुक्यातील प्रत्येक रूग्णालयाचे फायर ऑडीट प्राधान्याने करून घेण्यात यावे. रूग्णांना कोणताही भेदभाव न ठेवता तत्काळ बेड उपलब्ध करून देण्यात यावे. तालुक्यातील वृध्दाश्रमामध्ये जावून तेथील वृध्दांची व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी. आरोग्यसेवेकरीता मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास शिक्षकांच्या सेवा घेण्याची सुचना पवार यांनी केली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ज्या भागामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव जास्त आहे त्याठिकाणी कडक निर्बंध करावेत. आरोग्य विभागामध्ये भरतीप्रक्रीया सुरू करण्यात आली असून मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. सुपर स्प्रेड गावनिहाय यादी करावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर चालू करण्यात यावेत, इत्यादी सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उपाययोजनाबाबतची माहिती दिली.

—————————————————

...सांगलीच्या धर्तीवर तपासणी करा

सांगली जिल्ह्यात मोबाईल कोरोना चाचणी व्हॅन प्रत्येक गावात जावून नागरिकांची कोरोनाची तपासणी केली जाते. त्याच धर्तीवर बारामती तालुक्यातही मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

——————————————————

Web Title: Breaking the chain will save many lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.