अपहरणकर्र्तेे समजून दोघांना बेदम मारहाण
By Admin | Updated: August 13, 2015 04:33 IST2015-08-13T04:33:03+5:302015-08-13T04:33:03+5:30
दौंड-बारामती रोडवरील लाळगेवाडी या ठिकाणी चोर समजून दोन तरुणांना ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या हाती दिले. हा प्रकार चोरट्यांच्या अफवेतून संशयित समजून झाल्याचे

अपहरणकर्र्तेे समजून दोघांना बेदम मारहाण
कुरकुंभ : दौंड-बारामती रोडवरील लाळगेवाडी या ठिकाणी चोर समजून दोन तरुणांना ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या हाती दिले. हा प्रकार चोरट्यांच्या अफवेतून संशयित समजून झाल्याचे नंतर उघड झाले.
सध्या चोरट्यांच्या अफवेमुळे बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यात जागते रहोचा नारा ग्रामस्थांनी दिला आहे. रात्रभर जागरण व दिवसाही जागरूक राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुलांना पळवून नेत असल्याच्या अफवेने विद्यार्थी-पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाळगेवाडी परिसरात बारामती येथील एका कंपनीतील नवीन गाड्याची चाचणी करीत असणारे दोन तरुण किरण अरुण नवले (वय २७, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) व कृष्णा शिवाजी गोडसे (वय २५, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना या संशयातून मार खावा लागला. ते दोघे वासुंदे येथील गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात जात असताना दोन मुलींना पळवून नेण्यासाठी आले असल्याचे समजून बेदम मार खावा लागला.
वस्तुस्थिती मात्र वेगळीच होती. हे तरुण लाळगेवाडी परिसरात नवीन गाडीची चाचणी करताना काही कारणास्तव थांबले होते. मात्र त्यांना बघून या रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी मुली घाबरल्या व त्यांनी काही नागरिकांना याची सूचना दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस हवालदार पंडित मांजरे ,कच्चर शिंदे, बापू मोहिते, अमोल भोसले यांनी सर्व चौकशी करून पियाजो कंपनीचे अधिकारी राज माने व खलाटेसाहेब यांना बोलावून चौकशीनंतर खात्रीमुळे दोन्ही तरुणांना सोडून देण्यात आले. (वार्ताहर)
सतर्कता बाळगावी
विद्यार्थ्यांनी व पालकांनी घाबरण्याचे काही कारण नाही. मात्र तरीही खबरदारी म्हणून लहान मुलांनी कोठेही एकटे जाऊ नये. अनोळखी व्यक्तीबरोबर प्रवास करू नये. संशयित व्यक्ती असेल तर जवळपास असणाऱ्या नागरिकांशी संपर्क करावा. अशा प्रकारच्या सूचना शाळेमध्ये देण्यात आल्या आहेत, असे फिरंगाईमाता विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी सांगितले.