पुणे : यंदाच्या वर्षी पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत आणखी एक नवीन पायंडा पडला जाणार आहे. अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे दोन्ही मंडळे मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या मागोमाग मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. त्यामुळे खगोलशास्त्र आणि धार्मिकता याचा विचार करून दोन्ही मंडळांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
सर्व गणेश मंडळांनी आपली विसर्जन मिरवणूक रविवारी (दि.७) दुपारी १२ पूर्वी संपवावी. तसेच ढोलताशा पथकांची संख्या कमी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव दि. २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाची विसर्जन यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक अनंतचतुर्दर्शीला सुरु होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी दोनपर्यंत चालतो. दरवर्षी मंडईचा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता निघतो. यंदाच्या वर्षी अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी खग्रास चंद्रग्रहण आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहणकाळात देवतांच्या मूर्ती झाकून ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्या वेळेच्या आधी, म्हणजेच दुपारी १२ वाजण्यापूर्वी सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे दोन्ही मंडळे सायंकाळी नव्हे तर मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या मागोमाग मिरवणुकीत सहभागी होण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे थोरात यांनी सांगितले.
वेळेचा अपव्यय टाकण्यासाठी ढोलताशा पथके करणार कमी
विसर्जन मिरवणूक दरवर्षी ढोलताशा पथकांमुळे देखील लांबल्याचे पाहायला मिळते याविषयी विचारले असता थोरात म्हणाले, आम्ही यंदापासून ढोलताशा पथकांची संख्या कमीच ठेवणार आहोत. इतर सार्वजनिक मंडळांनी देखील मिरवणुकीसाठी नेमलेली पथकांची संख्या शक्य तितकी कमी ठेवावी जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही. सर्वांनी धार्मिक व सामाजिक जबाबदारी समजून वेळेपूर्वी संपवावी. कुठल्याही विलंबामुळे धार्मिक परंपरेवर गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी असे आवाहन थोरात यांनी केले आहे.
दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजताच निघणार
दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे गणपती गेल्यानंतर कामायनी, त्वष्टा कासार आणि पुणे महानगरपालिकेचा गणपती निघत असे. ते गणपती गेल्यानंतर चार ते सात या वेळेत कुठलेच मंडळ जाण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे आम्ही दोन वर्षांपूर्वी सायंकाळी ४ वाजताची वेळ निवडली. जेव्हा कुणीच जात नाही. यंदाही हाच पायंडा पाडला जाणार आहे. मानाच्या गणपतीनंतर जर दोन्ही मंडळांनी मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे नियोजन पोलीस प्रशासन करेल. हा लोकोत्सव आहे. त्यामुळे लोकभावनेला सर्वोच्च भावना आहे. दोन्ही मंडळांनी आम्हाला सांगितले होते की ग्रहण असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही ठरल्याप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजताच निघणार आहोत. - महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट