तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे बालकांना देणार बुस्टर लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:07+5:302021-07-07T04:12:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. आयसीयू, ...

Booster vaccine to be given to children due to the danger of the third wave | तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे बालकांना देणार बुस्टर लस

तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे बालकांना देणार बुस्टर लस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. आयसीयू, ऑक्सिजन खाटा, व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच, लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याने हा धोका कमी करण्यासाठी १ वर्षापर्यंतच्या बालकांची प्रतिकारकक्षमता वाढवण्यासाठी त्यांना निमोनियावर प्रभावी असणारी न्यूमोकोकल कॅजुलेट ही बुस्टर लस दिली जाणार आहे. यासाठी सोमवार (दि. १२) पासून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, ही लस महागडी असून तिची किंमत ही ५ हजारपेक्षा अधिक आहे. ती जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागातर्फे मोफत दिली जाणार आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके अधिक बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तर, पुणे जिल्हा परिषद बालकांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकात एक वर्षाच्या आतील बालाकांना न्यूमोनिया रोखण्यासाठी वापरली जाणारी न्यूमोकोकल कॅजुलेट ही लस मोफत दिली जाणार आहे.

बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी न्युमोकोकल कॅजुलेट ही लस दिली जाणार आहे. त्यात पहिला डोस वयाच्या सहाव्या आठवड्यात, दुसरा १४ आठवडे आणि तिसरा डोस नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर दिला जाणार आहे. या लसीच्या एका डोसची खासगीमध्ये पाच हजार रुपये किंमत आहे. ती जिल्हा परिषदेकडून मोफत दिली जाणार आहे असे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

दोन वर्षांच्या आतील मुलांना न्यूमोनिया होण्याचा अधिक धोका आहे. रुग्णालयात येणार खर्च अधिक असल्याने ते सर्वसामान्य पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे हा होऊच नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने न्यूमोकोकल कॅजुलेट ही लस दिली जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या १२ जुलैपासून जिल्ह्यात केली जाणार आहे.

----

आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

लसीकरण करण्यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक होते. त्यानुसार २ जुलै रोजी जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाले. ६ जुलैला तालुकास्तरावर, तर ७ जुलैला प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी दिली.

चौकट

प्राथमिक आराेग्य केंद्राच्या साहित्यासाठी साडेतीन कोटींची साहित्य खरेदी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जवळपास ३ कोटी ८६ लाख रुपयांच्या आरोग्यविषय साहित्याची खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यातील १५ आरोग्य केंद्रे आणि २३ उपकेंद्रांना या साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, बारामती, इंदापूर, शिरूर आणि दौंड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा यात समावेश आहे. ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी हे साहित्य गरजेचे असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली

Web Title: Booster vaccine to be given to children due to the danger of the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.