\Sलोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शास्त्रीय संगीताचे जाणकार, भाषा आणि इतिहास अभ्यासक व संग्राहक सरदार आबासाहेब मुजुमदार म्हणजे पुण्याचे वैभव. चिंतन, संशोधन आणि सखोल अभ्यासातून इतिहासाच्या अनेक पैलूंवर लेखन केले. या ऐतिहासिक लेखसंग्रहाचा अमूल्य ठेवा त्यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांनी पुस्तकरूपात आणला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे.
‘सरदार आबासाहेब मुजुमदार: ऐतिहासिक लेखसंग्रह’ हे पुस्तक ग्रंथसखा प्रकाशन (बदलापूर) चे श्याम जोशी यांनी प्रकाशित केले आहे. संपादन अनुपमा मुजुमदार यांनी केले आहे.
मुुजुमदार यांनी सांगितले की, आबासाहेबांचे पुत्र डॉ. गणेश गंगाधर उर्फ बाळासाहेब मुजुमदार यांनी या ऐतिहासिक लेखांचा एक एक कागद जपून ठेवल्याने या पुस्तकाचे संपादन करता आले. श्रीमंत नानासाहेब पेशवे विरचित ‘श्री गणेश कुतुकामृत’,‘संगीत व श्री गुरूचरित्र’,‘श्रीगुरूचरित्रातील उतारा’, ‘संगीत मकरंदातील उतारा, ‘शनिवारवाड्याची आग’,‘पेशव्यांचा गोखाना’, नानासाहेब पेशवे यांस मुखत्यारपत्र’, दादासाहेब पेशवे यांचे पद’, ‘पेशव्यांच्या ग्रामदेवता आणि कुळदेवता’, ‘तुकारामांचे गुरू बाबाजी’, ‘पुणे शहरातील ताबूत व पंजे’, ‘अंतापूर येथील एक मूर्ती’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ असे एकूण १२२ लेख पुस्तकात आहेत.
फारसी, मोडी भाषेतील लेखही आबासाहेबांच्या संग्रहात होते. त्यांचाही धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे. याकरिता मला इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे आणि डॉ. राजा दीक्षित यांचे मार्गदर्शन लाभले. पुस्तकात बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह वा. ल. मंजुळ, डॉ. उदयसिंह पेशवा, डॉ. जी.टी कुलकर्णी, प्र. ना. मुजुमदार यांनी आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.