ब्लेडने गळा कापून अज्ञात महिलेचा खून

By Admin | Updated: February 26, 2017 21:55 IST2017-02-26T21:55:41+5:302017-02-26T21:55:41+5:30

उंडवडी (ता. बारामती) येथे ब्लेडच्या साहाय्याने खून के लेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे.

The blood of an unknown woman is cut off by blade | ब्लेडने गळा कापून अज्ञात महिलेचा खून

ब्लेडने गळा कापून अज्ञात महिलेचा खून

ऑनलाइन लोकमत
बारामती, दि. 26 - उंडवडी (ता. बारामती) येथे ब्लेडच्या साहाय्याने खून के लेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचा ब्लेडने गळा कापला आहे. उंडवडी क. प. परिसरात बारामती-पाटस रस्त्यापासून काही अंतरावर हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची फिर्याद उंडवडी क.प.चे उपसरपंच बाळासाहेब नारायण जराड यांनी दिली आहे. शनिवारी, दि.२५ फेब्रुवारी रोजी चंद्रकांत सदाशिव जराड (रा. उंडवडी) यांना सायंकाळी ५च्या सुमारास उंडवडी गावच्या परिसरात बारामती-पाटस रोडपासून ५० मीटर अंतरावर एका महिलेचा मृतदेह आढळला. गट नं. ३८५ या शेतजमिनीतील झुडपांमध्ये अंदाजे ३० ते ३५ वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह असल्याचे त्यांनी तातडीने उउपसरपंच बाळासाहेब जराड यांना मोबाईलवर सांगितले. यानंतर जराड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या वेळी सदर अज्ञात मयत महिलेच्या मृतदेहाशेजारी ब्लेड व काचा पडलेल्या असल्याचे दिसून आले. तसेच, त्या महिलेचा गळा कापलेला दिसून आला, तसेच मानेवर ब्लेडच्या जखमा आढळून आल्या. दरम्यान, बारामती पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सदर मयत महिलेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे नाव व पत्ता अद्याप समजला नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. अज्ञात महिलेच्या खूनप्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गौड करत आहेत.
दरम्यान, त्या महिलेचा गळा कापल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन करताना स्पष्ट झाले आहे, अशी महिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश भाई यांनी सांगितले.

Web Title: The blood of an unknown woman is cut off by blade