डोळस समाजाचे अंधत्व हा अडथळा : राहुल देशमुख; ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:08 IST2018-02-06T13:03:46+5:302018-02-06T13:08:29+5:30
अंधत्व ही आमची अडचण नसून, डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य अडथळा आहे. अंधत्वावर मात करीत अंध व अपंगांसाठी संगणक शिक्षण देऊन सक्षमीकरणाचे काम करणारे राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.

डोळस समाजाचे अंधत्व हा अडथळा : राहुल देशमुख; ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ वितरण
पुणे : अंधत्व ही आमची अडचण नसून, डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य अडथळा आहे. इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही जग जिंकू शकतो, आम्हाला ध्येय गाठण्यासाठी सर्वांची साथ अपेक्षित असल्याचे मत स्वत: अंध असून, अंधत्वावर मात करीत अंध व अपंगांसाठी संगणक शिक्षण देऊन सक्षमीकरणाचे काम करणारे राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ समितीचे प्रांत सह-कोषाध्यक्ष चंदन कटारिया, प्रांत उपाध्यक्षा पूनम मेहता, पुणे महानगर अध्यक्ष विश्वास जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, देवता देशमुख, प्रांत कार्यवाह शैलेंद्र बोरकर, पश्चिम महाराष्ट्रप्रमुख गणेश बागदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक्केचाळीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
चंदन कटारिया यांनी प्रास्ताविक केले. समितीच्या महानगर उपाध्यक्षा अलका पेटकर यांनी परिचय करून दिला. अश्विनीकुमार उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास जोशी यांनी आभार मानले.
अंधांबाबतच्या गैरसमजांमुळे रेल्वेच्या फलाटावर झोपून शिक्षण घेतले. समाजात बरे-वाईट अनुभव आले. ध्येयाप्रती आत्मविश्वासानाने जाताना खचलो नाही. आपली परिस्थिती बदलण्यासाठी बाहेरून कोणी येईल याचा विश्वास नव्हता. आपल्यावर आलेली वेळ इतर अंध व अपंगांवर येऊ नये, म्हणून कार्यरत झालो. त्यातून सुमारे ९०० अंध व अपंगांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन सक्षम करता आले.
- राहुल देशमुख
अनेक प्रकारच्या समस्या येतात, परंतु त्याचा धैर्याने सामना केला पाहिजे, ही स्वामी विवेकानंदांची शिकवण होती. याच प्रेरणेतून राहुल देशमुख यांच्यासारखे कार्यकर्ते घडतात.
- काशिनाथ देवधर