सोशल मीडियावर भाजपाची लाट
By Admin | Updated: February 24, 2017 03:10 IST2017-02-24T03:10:47+5:302017-02-24T03:10:47+5:30
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल गुरुवारी दिवसभर

सोशल मीडियावर भाजपाची लाट
पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल गुरुवारी दिवसभर व्हॉटस्अॅप, फेसबुक, आणि मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून सोशल मीडियावरदेखील भाजपाचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँगे्रसला पूर्ण बहुमत.... पुणेकर झोपेच्या वेळेला सभेला जात नाही, पण कोणाला झोपवायचे ते घरीच बसून ठरवितात.... भाजपाची त्सुनामी, मोदींची लाट अन् देवेंद्र मॅन आॅफ द मॅच अशा एक ना अनेक पोस्ट गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर दिवसभर फिरत होते.
पुण्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा फ्लॉप गेल्यानंतर राष्ट्रवादी , शिवसेनेसह अन्य पक्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच या सभेची प्रचंड खिल्ली उडविल्याने भाजपाची झोपच उडाली होती. याशिवाय भाजपामध्ये झालेले गुंडांचे प्रवेश असो की, आरपीआयच्या उमेदवारांचा कमळ चिन्हावर लढण्याचा निर्णय, सर्वच विषय सोशल मीडियावर अत्यंत चविष्ट ठरले. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका सोशल मीडियावरही चांगल्याच गाजल्या. त्यामुळे गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट पडण्यास सुरुवात झाली होती. त्यात सायंकाळनंतर राज्यातील मुंबई आणि ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी घेतल्यावर सोशल मीडियावर तर भाजपाच्या विजयीश्रीच्या पोस्टचा पाऊसच पडायला सुरुवात झाली. यामध्ये कोणी मुख्यमंत्र्यांच्या सभेची आठवण करून देत होते, तर कोणी प्रचारामध्ये झालेल्या विविध आरोपांच्या दाखल्यांना उत्तर देत होते. तर प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्यासह अनेकांनी खास व्यंगचित्र काढून भाजपाच्या या विजयाची दाद देत होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचे वातावरण, उमेदवारी जाहीर होणे, प्रचार आणि विजयोत्सव सर्वच गोष्टी सोशल मीडियाने हायजॅक केल्या आहेत. (प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावरील प्रचार अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीत सत्तेवर आलेल्या आप पक्षाने दाखवून दिले आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या वेळी प्रथमच भाजपासोबतच राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, काँगे्रससह सर्वच पक्षांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला. प्रत्येक उमेदवारालादेखील याचे महत्त्व पडल्याने लाखो रुपयांचे पॅकेज देऊन सोशल मीडियावर प्रचार केला.