भाजपाने टाळली यादी

By Admin | Updated: February 3, 2017 04:24 IST2017-02-03T04:24:08+5:302017-02-03T04:24:08+5:30

महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याच्या भीतीने भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करणे टाळण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा १४४ उमेदवारांना

BJP has avoided the list | भाजपाने टाळली यादी

भाजपाने टाळली यादी

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याच्या भीतीने भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करणे टाळण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा १४४ उमेदवारांना फोन करून कार्यालयातून बोलावून गुपचूप ए व बी फॉर्मचे वाटप करण्यात आले. त्यानुसार पक्षाने ५ विद्यमान नगरसेवकांसह ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे तिकीट पक्षाकडून कापण्यात आले. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अनपेक्षित नावांवर मोहोर उमटविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
भाजपाच्या उमेदवारांची नावे निश्चित करताना पक्षाच्या कार्ड कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजीचे दर्शन झाले. अनेक उमेदवारांच्या नावावर शेवटपर्यंत एकमत होऊ शकले नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करून उमेदवारांची नावे निश्चित केली. मध्यरात्री उशिरापर्यंत १५ नावांवर एकमत होऊ शकले नाही. अखेर उमेदवारांची यादी जाहीर न करता गुपचूप ए व बी फॉर्मचे वाटप करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला.
कसबा मतदारसंघातील विद्यमान चौघा नगरसेवकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला आमदारांच्या विरोधामुळे तिकीट देण्यात आले नसल्याची माहिती उजेडात आली आहे. भाजपाच्या या उमेदवार यादीमुळे मोठी नाराजी पसरली आहे.
उमेदवारी देण्यात आलेल्या उमेदवारांना गुरुवारी रात्री भाजपा कार्यालयातून फोन करण्यात आले. त्यामध्ये भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, मुक्ता टिळक, अनिल टिंगरे, हेमंत रासने, मंजूश्री नागपुरे, प्रकाश ढोरे, श्रीनाथ भिमाले, श्रीकांत जगताप, सुनील कांबळे, प्रसन्न जगताप, वर्षा तापकीर, मोहिनी देवकर, अभिषेक देवकर, सिद्धार्थ शिरोळे, मदिना तांबोळी, योगेश समेळ, धीरज घाटे, महेश लडकत, स्मिता वस्ते, राजा बराटे, गायत्री खडके, सुश्मिता चौधरी, वृषाली चौधरी, सम्राट थोरात, आरती कोंढरे, पप्पू कोठारी, अजय खेडेकर, रोहिणी नाईक, उमेश चव्हाण, अमोल बालवडकर, राहुल कोकटे, आदित्य माळवे, सतीश बहिरट, राजश्री काळे, योगेश मुळीक, दिलीप तुपे, संदीप जऱ्हाड, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे, आशा बिबवे, कल्पना जाधव आदींचा समावेश आहे. एक हजारपेक्षा जास्त इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या.
(प्रतिनिधी)

शिवसेनेनेही यादी जाहीर करणे टाळले
भाजपाबरोबरच शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर करणे टाळले आहे. शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही इच्छुकांनी पक्षाच्या नावावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उर्वरित इच्छुकांकडून शुक्रवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पक्षाकडून ए व बी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे.

इच्छुकांनी जागविली रात्र
भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता शुक्रवारी रात्री गुपचूप फोन करून ए व बी फॉर्म घेण्यासाठी बोलावले जात होते. त्यामुळे अनेक इच्छुकांनी फोन हातात घेऊन रात्र जागून काढली.

नाराजीचा सामना करावा लागणार
भाजपाकडून विद्यमान नगरसेवकांसह अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले. अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नव्याने आलेल्यांचे पत्ते कट
इतर पक्षांमधील अनेक आजी व माजी नगरसेवकांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला. मात्र त्यापैकी अनेकांना भाजपाकडून तिकीट देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: BJP has avoided the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.