पुणे : एक केंद्रीय मंत्री, राज्यात दोन मंत्री, त्याशिवाय ६ आमदार, १०१ नगरसेवक, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असे असूनही भारतीय जनता पार्टी पुणेकरांची फसवणूक करत आहे हे मी विविध प्रश्नांच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनात उघड करणार आहे असे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनी सांगितले. शहराच्या एकाही समस्येवर राज्य सरकार काम करायला किंवा निधी द्यायला तयार नाही हे पुणेकरांच्या नजरेस आणणार आहे असे ते म्हणाले.नागपूरचे हे अधिवेशन फक्त १० दिवसांचे आहे. त्याची मुदत वाढवावी अशी मागणी काँग्रेसने केली होती, मात्र ती अमान्य करण्यात आली. त्यामुळे आहे त्या दिवसांमध्येच समस्या मांडाव्या लागणार आहे. प्रामुख्याने कचरा प्रश्नाबाबत पुणेकरांची फसवणूक झाली आहे. राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांनी डेपोसाठी कायम स्वरूपी जागा मिळवून देऊ असा शब्द दिला होता. अजूनतरी त्यांनी तो पाळलेला नाही. ही समस्या बिकटच होत चालली आहे असे गाडगीळ म्हणाले.स्मार्ट सिटी ही या शहराची आणखी एक फसवणूक. त्यासाठी महापालिकेचे अधिकार कमी करून स्वतंत्र कंपनी स्थापन केली. या कंपनीचा अहवाल नुकताच बाहेर आला, त्यात ५२ पैकी एखादा प्रकल्प वगळता काहीही सुरू झालेले नाही. सल्लागार कंपन्याचे काम असमाधानकारक असताना त्यांच्यावर मात्र कोट्यवधी रूपये उधळले जात आहेत. ही कंपनी नक्की करते काय, कोणते काम करणार आहे, काही करते आहे किंवा नाही याबाबत विचारणा करणार आहे.नागपूरच्या मेट्रोची ट्रायल सुरू होणार आहे, पुण्याच्या मेट्रो चा एक खांबही अजून उभा राहिलेला नाही. हा दुजाभावच आहे व कोणीही त्याविरोधात आवाज उठवत नाही, म्हणून अन्याय वाढतच चालला आहे. वास्तविक नागपूरच्या तुलनेत पुण्याला मेट्रो आधी असणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. हा विषय अधिवेशनात उपस्थित नक्की करू. पुणेकरांच्या भावना सरकारच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे, अन्यथा यापुढेही असेच होत राहील.वाहतुकीबाबतही सरकारचे पुण्याकडे दुर्लक्षच झाले आहे, त्याचाही जाब विचारू असे गाडगीळ म्हणाले. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून द्यावी, अशी अनेक वर्षे पुण्यातून मागणी होत आहे, मात्र सरकार त्यासाठी काहीही करत नाही. महापालिकेने त्यांचे असलेले वाहतूक सहायक काढून टाकले. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडली आहे. या सर्वच गोष्टींबाबत अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार आहे.
भाजपा पुण्याची फसवणूक करत आहे : काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 18:35 IST
भाजपा फसवणूक करत आहे, हे विविध प्रश्नांच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनात उघड करणार, असे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनी सांगितले.
भाजपा पुण्याची फसवणूक करत आहे : काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांची टीका
ठळक मुद्देस्मार्ट सिटी ही या शहराची आणखी एक फसवणूक : गाडगीळ'वाहतुकीबाबतही सरकारचे पुण्याकडे दुर्लक्षच, त्याचाही जाब विचारू'