शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच बिल
By Admin | Updated: March 24, 2015 23:19 IST2015-03-24T23:19:36+5:302015-03-24T23:19:36+5:30
जिल्हा परिषद शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच वीजबिल आकारले जाते, असे महावितरणने आज स्पष्ट केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा करण्यात येतो; त्या
शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच बिल
पुणे : जिल्हा परिषद शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच वीजबिल आकारले जाते, असे महावितरणने आज स्पष्ट केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा करण्यात येतो; त्यामुळे प्राथमिक शाळांची वीज देयके भरणे कठीण होते. पर्यायाने वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्य अभियंता वाडेकर यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांची बैठक झाली. बैठकीला शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, महावितरणचे सदस्य प्रवीण शिंदे, बारामती मंडळाचे अधीक्षक अभियंता इरवाडकर, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी वरील प्र्रश्न महावितरणकडे मांडला असता वाडेकर यांनी, सर्व शिक्षणसंस्था या सार्वजनिक सेवा प्रकारामध्ये येत असल्यामुळे त्यांना सार्वजनिक सेवा दरानुसारच आॅगस्ट २०१२पासून आकरणी करण्यात येत आहे. ज्या शाळांना अजूनही व्यापारी सेवा दराप्रमाणे वीज देयके येत असतील, त्यांनी त्यांचे नजीकचे बिल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये घेऊन संपर्क साधावा. तसे आढळ्ल्यास सार्वजनिक सेवा दरानुसार वीज देयक आकारणी तत्काळ करून देण्यात येईल. आॅगस्ट २०१२पासून त्यांनी जादा रक्कम भरली असेल, ती पुढील देयकांमध्ये समायोजित करण्यात येईल, असे सांगितले.
जिल्हा परिषद शाळांमधील वीज देयके सार्वजनिक सेवा दरानुसार येत आहेत किंवा नाही याची खात्री करा, अशा सूचना शुक्राचार्य वांजळे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
असे आकारले जातात दर
घरगुती वीज आकारणी - (एलटी -१) - ४ रू.०७ पैै.
व्यावसायिक वीजआकारणी - (एलटी -२) - ७ रू.१३ पैै.
सार्वजनिक सेवा - (एलटी -१0) - ६ रू.३७ पैै.