मोठी बातमी : पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु करण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 07:51 PM2020-11-11T19:51:03+5:302020-11-11T19:55:03+5:30

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पालिका वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहे.

Big news: Pune Municipal Corporation's medical college is recommended to start next year | मोठी बातमी : पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु करण्याची शिफारस

मोठी बातमी : पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु करण्याची शिफारस

Next
ठळक मुद्देराज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाला पाठविली शिफारस

लक्ष्मण मोरे- 

पुणे : महापालिकेच्या महत्वाकांक्षी वैद्यकीयमहाविद्यालयाचा सुधारित प्रस्ताव  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्य केला असून पुढील शैक्षणिक वर्षात (२०२१-२२) मध्ये १०० विद्यार्थ्यांसह हे महाविद्यालय सुरु करण्याची शिफारस राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे  विद्यापीठाने केली आहे. पालिकेने सुधारीत प्रस्ताव दिल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात हा सकारात्मक प्रतिसाद आल्याने महाविद्यालय उभारणीचा महत्वाचा टप्पा पार पडला आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पालिका वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहे. याकरिता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना ही संकल्पना मांडली होती. दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मुख्य सभेच्या मान्यतेने या महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. महापालिकेने या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंदाजपत्रकात तरतूद केलेली आहे. गुजरातच्या अहमदाबाद महापालिकेने उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर हे महाविद्यालय उभारले जाणार असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले. या महाविद्यालयासाठी डॉ. नायडू रुग्णालयाची बारा एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून महाविद्यालयासाठी न्यास स्थापन करण्यास परवानगी मिळाल्यानंतर धमार्दाय आयुक्तांकडे न्यासाची नोंदणी करण्यात आली.

मुंबईतील वैद्यकीय शिक्षण संचालक आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावात महाविद्यालयाची जागा न्यासाच्या मालकीची असणे आवश्यक असल्याची त्रूटी काढली होती. पालिका प्रशासनाने पालिकेच्या मालकीची जागा न्यासाला देण्यास मान्यता देऊन कागदपत्रांची पूर्तता करीत सुधारीत प्रस्ताव एमयुएचएसला सोमवारी पाठविला होता. हा प्रस्ताव विद्यापीठाने मान्य केला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे अधिका-यांकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मान्यतेची प्रक्रिया पार पडणार असल्याचे डॉ. साबणे यांनी सांगितले.
====
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार सामंजस्य करार्तातील अटी व शर्तींच्या अधिन राहून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून १०० विद्यार्थी क्षमतेसह महाविद्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाला शिफारस करण्यात आली आहे. हा प्रस्ताव पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे.
====
वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी अंतिम प्रस्ताव शासनाच्या  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली असून महाविद्यालयाची शिफारस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत माझी डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून सचिव स्तरावरील कार्यवाही सुद्धा लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश सुरु होऊ शकतील. महत्वाचा टप्पा पार पडला आहे.
- रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त (ज.), पुणे महानगरपालिका
====
मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना २०१७ साली ही संकल्पना मांडली होती. दोन वर्षांपासून या विषयाचा पाठपुरावा सुरु आहे. ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णालय उभारणे, ट्रस्ट नोंदणी आणि परवानगीसाठी एमयूएचएसला प्रस्ताव सादर करणे हे टप्पे पार पडले. एमयूएचएसने सकारात्मक शिफारस राज्य शासनाकडे केल्याने महत्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. यानंतर आता अंतिम मान्यता आणि महाविद्यालय प्रत्यक्षात उभे राहण्याची प्रक्रिया सुरु होईल.
- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

Web Title: Big news: Pune Municipal Corporation's medical college is recommended to start next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.