भुलेश्वर घाटाने घेतला मोकळा श्वास, नवीन वर्षात होणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 03:55 IST2018-01-01T03:54:56+5:302018-01-01T03:55:01+5:30
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर व दौंड तालुक्याला जोडणाºया भुलेश्वर घाटाची दुरवस्था झाली आहे. पाणी वाहून जाणा-या चा-या ठिकठिकाणी बुजल्याने तसेच घाटाला संरक्षण कठडे नसल्याने भुलेश्वर घाटाची आजही दुरवस्था झाली आहे. मात्र आता चारीतील झाडे काढण्यास सुरुवात झाल्याने श्री क्षेत्र भुलेश्वर घाट नवीन वर्षात मोकळा श्वास घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भुलेश्वर घाटाने घेतला मोकळा श्वास, नवीन वर्षात होणार दुरुस्ती
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर व दौंड तालुक्याला जोडणाºया भुलेश्वर घाटाची दुरवस्था झाली आहे. पाणी वाहून जाणा-या चा-या ठिकठिकाणी बुजल्याने तसेच घाटाला संरक्षण कठडे नसल्याने भुलेश्वर घाटाची आजही दुरवस्था झाली आहे. मात्र आता चारीतील झाडे काढण्यास सुरुवात झाल्याने श्री क्षेत्र भुलेश्वर घाट नवीन वर्षात मोकळा श्वास घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्याकडे सासवड -यवत रस्त्याबरोबरच भुलेश्वर घाटाचीही दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंडळाकडून पाच कोटी चाळीस लाखांचा निधीही मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. यात भुलेश्वर घाटाचेही रुंदीकरण करण्यात आले. मात्र हा घाट सुरुवातीपासूनच पुरंदर व दौंड तालुक्यांच्या विभागाच्या कात्रीत सापडला. कामाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही तालुक्यांच्या हद्दीमध्ये हे काम वनविभागाने बंद केले. यामुळे या घाटाचे सुरुवातीपासूनच अनेक अडथळे आले. घाटाचे रुंदीकरण करताना डोंगर सरळ तोडण्यात आला. यामुळे उन्हाने डोंगर तापून पावसाळ्यात तो भिजला जाऊन सध्या ठिकठिकाणी दरड कोसळत आहेत. पाणी वाहून जाणाºया चारीमध्ये डोंगराची दगडमाती पडल्याने चारी ठिकठिकाणी बुजल्या आहेत. या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येते. यामुळे अनेक ठिकाणी घाटरस्ता खराब झाला आहे. घाटाचे रुंदीकरण झाले मात्र पुलांची कामे करण्यात आली नाहीत. नवीन पुलांचे पाईपही घाटात टाकले गेले. मात्र आज त्या ठिकाणी पाईपच दिसत नाहीत. हे पाईप गेले कुठे?, रस्ता दुरुस्त करण्याअगोदर अरुंद पुलांची कामे का झाली नाहीत, याकडे मात्र कोणीही लक्ष दिले नाही. यामुळे आजही येथील अरुंद पुलावरुन वाहतूक सुरु आहे.
पावसाळ्यानंतर दरवर्षी भुलेश्वर घाटात असणारी जंगली झाडे इतक्या जास्त प्रमाणात वाढतात, की झाडांच्या फांद्या पार रस्त्यावर येतात. यामुळे समोरची गाडी न दिसून आजपर्यंत एकदा नव्हे तर अनेकदा या घाटात अपघात झाले आहेत. मात्र प्रशासन याकडे लक्ष देणार तरी केव्हा? हा प्रश्न या घाटातून प्रवास करणाºयांना पडला आहे. भुलेश्वर घाटाच्या वर असणाºया माळशिरस, टेकवडी, पोंढे या गावांना यवत या गावी दळणवळण करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, तर घाटाच्या वरील बाजूला असणारे भुलेश्वर मंदिर पाहण्यासाठी शिल्पकला अभ्यासक, पर्यटक, भुलेश्वरभक्त याठिकाणी सतत येत असतात. पुण्यापासून ७0 किलोमीटरवर भुलेश्वर मंदिर आहे. यामुळे बहुतांश भाविक भुलेश्वरला येण्यासाठी याच घाटाचा वापर करतात. यामुळे हा घाट सुरक्षित असणे गरजेचे आहे.
भुलेश्वर घाटाची दुरवस्था झाली असल्याने बुजलेल्या चाºया व रस्त्यावरील आलेली झाडे मोठ्या प्रमाणात वाढली होती. ती त्वरित काढणे गरजेचे होते. यामुळे वारंवार अपघात होत होते. परंतु चारीमधील झाडे काढल्याने आता सुखद प्रवास होणार आहे.
- मस्कू शेंडगे,
अध्यक्ष, लहूजी शक्ती सेना
कठड्यांच्या दुरुस्तीची गरज
१९७२मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना या घाटाचे काम करण्यात आले. त्यावेळेस दगडगोट्यांमध्ये कच्चे साईड कठडे बांधण्यात आले. आजतागायत त्याकडे कोणीही पाहिले नाही. अनेक ठिकाणी कठडे ढासळलेले आहेत. ते दुरुस्त करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी वाहून जाणाºया चाºया मोकळ्या करणे गरजेचे आहे.
काही ठिकाणी खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील भाविकांनी केली होती. त्यानुसार नववर्षाच्या पूर्वसंध्येला चारीमधील झाडी काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अपघातग्रस्त घाटाने मोकळा श्वास घेतला आहे. लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष मस्कू शेंडगे यांनी पाच महिने संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.