भोरला रस्त्यांची कामे रखडली
By Admin | Updated: June 2, 2014 01:16 IST2014-06-02T01:16:51+5:302014-06-02T01:16:51+5:30
पावसाळा तोंडावर आला, तरी मागील तीन महिन्यांपासून वर्कआॅर्डर मिळूनही भोर नगरपलिकेकडून मंजूर सुमारे अडीच कोटी रुपयांपैकी दीड कोटी रुपयांची रस्त्याची कामे रखडली आहेत

भोरला रस्त्यांची कामे रखडली
भोर : पावसाळा तोंडावर आला, तरी मागील तीन महिन्यांपासून वर्कआॅर्डर मिळूनही भोर नगरपलिकेकडून मंजूर सुमारे अडीच कोटी रुपयांपैकी दीड कोटी रुपयांची रस्त्याची कामे रखडली आहेत. सदर कामांचे सुपरव्हिजन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्याने स्थानिक ठेकेदारांचा काम करण्यास नकार, तर नगरपालिका प्रशासनाकडून संबंधित कामांचे टेंडर रद्द करून नव्याने निविदा मागवण्याचा विचार आहे. मात्र, तोपर्यंत पावसाळा आल्याने रस्त्यांची कामे मात्र होणार नाहीत, हे नक्की. ठेकेदारांच्या अडमुठे धोरणाबाबत नागरिकांच्या तीव्र येत आहेत. रस्त्यांची कामे पेव्हर मशिनद्वारे करावयाची आहेत. बी.बी. एम कारपेट सिलकोट असे कामाचे स्वरूप आहे. त्यासाठी व्हायब्रोटर रोलरचा वापर करून आधुनिक पद्धतीने कामे करावयाची आहेत. भोर शहरातील काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके ठेकेदारांना स्वत:च्या नावावर कामे करता येतात. इतर दुसर्याच नावावर कामे करतात, त्यांना लायसन नाही. नगरपालिकेचा बांधकाम विभागाकडून कामांकडे अधिक लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे कामांचा दर्जा राहत नव्हता. एक वर्षाच्या आत रस्ते खराब होत होते. यामुळे या वेळी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतली जाणार आहेत. कामाचा दर्जा राखावा लागेल. निकृष्ट काम करता येणार नाही. या भीतीमुळे सुमारे दीड कोटीची कामे रखडली आहेत. ठेकेदाराने बांधकाम विभागाकडे कामे देण्यास विरोध केल्याचे समजते. याबाबत बैठका होऊनही कोणताच तोडगा निघाला नाही. पावसाळा आल्याने कामे रखडणार. नगरपालिका प्रशासनाकडून सदरच्या कामांचे नव्याने निविदा मागवून पुन्हा टेंडर काढणार असल्याचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)