भीमा-पाटसच्या व्यवस्थापनाचा निषेध - हनुमंत वाबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 01:05 IST2018-11-08T01:05:18+5:302018-11-08T01:05:28+5:30
भीमा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कामगारांना दिवाळी बोनस दिला नसल्याने व्यवस्थापनाचा निषेध कण्यात येत आहे.

भीमा-पाटसच्या व्यवस्थापनाचा निषेध - हनुमंत वाबळे
पाटस - भीमा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कामगारांना दिवाळी बोनस दिला नसल्याने व्यवस्थापनाचा निषेध कण्यात येत आहे. दरम्यान, भविष्यात कामगारांची पिळवणूक कायम राहिल्यास कामगार गप्प बसणार नाहीत. परिणामी तीव्र आंदोलन केले जाईल, आसा इशारा भीमा कामगार साखर संघाचे सरचिटणीस हनुमंत वाबळे यांनी दिला.
कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या कामगार सभेत ते बोलत होते. कारखाना व्यवस्थापनाकडे कामगारांचे जवळपास ३७ कोटी रुपये थकीत आहेत. असे असताना केवळ कारखान्याचे हित, अडचणीत असलेला ऊस उत्पादक शेतकरी हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून गेल्या काही वर्षांपासून कामगार काम करीत आहेत. मात्र, याचे कुठलेही सोयरसुतक व्यवस्थापनाला नाही, ही गंभीर बाब आहे. शेवटी कामगार तरी हा अन्याय कीती दिवस सहन करणार, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कारखान्याकडे कामगारांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असताना व्यवस्थापनाने दिवाळीत कामगारांना बोनस देण्याचे नियोजन करू नये, ही गंभीर बाब आहे.
दरम्यान, पुढील तीन दिवस कामगार काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे शेवटी वाबळे म्हणाले. केशव दिवेकर, रामदास बरकडे यांनी मनोगत व्यक्त केले.