"Best parking photo prize" | ''बेशिस्त पार्किंगच्या छायाचित्राला मिळणार बक्षीस''
''बेशिस्त पार्किंगच्या छायाचित्राला मिळणार बक्षीस''

पुणे : पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. पार्किंगला जागा उपलब्ध नसून बेशिस्तपणा वाढला आहे. या बेशिस्तीला आवर घालण्यासाठी पुढील काळात बेशिस्तपणे वाहन लावल्याचे छायाचित्र काढून पाठविणाऱ्यास दंडापैकी २० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सिम्बायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटीच्या वतीने किवळे येथे ‘लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि एमएसएमई क्षेत्रातील संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. लॉजिस्टिक स्किल कौन्सिल (एलएससी) चे परिषदेला सहकार्य होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रो-कुलगुरू डॉ. स्वाती मुजूमदार,डॉ. श्रवण कडवेकर, डॉ. रामानुजन आदी उपस्थित होते. गडकरी यांच्या हस्ते यावेळी रस्ते सुरक्षा आणि अपघात संशोधनासाठी नव्याने उभारलेल्या ‘जे पी रिसर्च सेंटर आॅफ एक्सलन्सचे’ चे उद्घाटन झाले.
देशातील पार्किंगच्या गंभीर स्थितीविषयी गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. तसेच या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कमी जागेत अधिक वाहनांचे पार्किंग करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परिवहन विभागाच्या सर्वेक्षणानुसार देशात राज्य शासनाच्या सहकार्याने दोन हजारांहून अधिक बस पोर्ट उभारता येऊ शकतात. बसस्थानकांमधील मोठ्या प्रमाणावरील जागेचा वापर त्यासाठी करता येईल. याचा उपयोग बसस्थानकांसह इतर दळणवळणाच्या सोयींना जोडण्यासाठीही करता येणार आहे. तसेच विविध कार्यालये, दुकाने, बँका आदी व्यावसायिक कारणांसाठी बसपोर्टचा उपयोग होईल. नॅशनल हायवे अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून दिल्लीतील आपल्या कार्यालयासमोर ‘ईझी पार्क’ ही स्वयंचलित कार पार्किंग इमारत उभारली. अशाप्रकारच्या ५० पेक्षा अधिक इमारती मोठ्या शहरांमध्ये उभारण्यात येत असल्याचे गडकरी म्हणाले.

Web Title: "Best parking photo prize"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.