हणमंत पाटील-पिंपरी : लॉकडाऊनपूर्वी वायसीएम रुग्णालय व पी. जी. इन्स्टिट्यूटमधील ११८ डॉक्टरांच्या भरतीची प्रशासकीय प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण झाली होती. त्यानंतर भरतीच्या अर्थकारणावरून सत्ताधारी भाजपच्या विधी समिती व मुख्य सभेने विषय मंजुरीला चार महिने टाळाटाळ केली. यावरून भोसरीचे आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक दोन गटांत वर्चस्वावरून वाद सुरू झाला. आर्थिक लाभ कोणत्याही एका गटाला मिळू नये,म्हणून चिंचवड गटाने घाईने बुधवारी विषय मंजूर केला. त्यात भांडणाचा ‘लाभ’ डॉक्टरांना झाला.
सर्वसाधारण सभेत डॉक्टर भरतीवरून प्रत्येकी ५० लाख भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला. विशेष म्हणजे जगताप यांचा समर्थक गट डॉक्टर भरतीसाठी आग्रही होता. मात्र, लांडगे समर्थक नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे दोन्ही गटांतील वाद चव्हाट्यावर आले. आता पडद्यामागे रंगलेल्या आर्थिक उलाढालीची चर्चा रंगली आहे. वायसीएममधील व पदव्युत्तर संस्थेकरिता ११८ डॉक्टरांच्या नियुक्तीला राज्य शासन व महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र, कायमस्वरूपी भरतीसाठी ‘दाम’ची अपेक्षा सुरू झाली. भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याने त्यासाठी पुढाकार घेतला. भाजपचे जुने निष्ठावंत पदाधिकारी अर्थकारण जुळविण्यासाठी तीन महिने राबले. बोलणीही झाली. संबंधित डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्याचे ठरले.
....................
‘धूसफूस-कुजबुज’ कशावरून...शेतकऱ्यांना आरक्षणाचा मोबदला देणे वाकडमधील विकासकामे मार्गी लावणे स्थायी समिती अध्यक्ष मारहाण प्रकरणडॉक्टर भरतीच्या विषयाचा मंजुरी