सुरू झाला ‘पुरुषोत्तम’चा जल्लोष
By Admin | Updated: August 17, 2015 02:22 IST2015-08-17T02:22:58+5:302015-08-17T02:22:58+5:30
महाविद्यालयीन तरुणाईच्या गळ््यातील ताईत असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला रविवारपासून भरत नाट्य मंदिर येथे जल्लोषात सुरुवात झाली

सुरू झाला ‘पुरुषोत्तम’चा जल्लोष
पुणे : महाविद्यालयीन तरुणाईच्या गळ््यातील ताईत असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला रविवारपासून भरत नाट्य मंदिर येथे जल्लोषात सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच ‘आव्वाज... कुणाचा!’ या नाऱ्याने नाट्य मंदिराचा परिसर दणाणून सोडला.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित पुरूषोत्तम करंडक या स्पर्धेचे हे ५१ वे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांच्या ५१ एकांकिका सहभागी झाल्या आहेत. येत्या ३० आॅगस्टपर्यंत या एकांकिकांमध्ये प्राथमिक फेरी रंगणार आहे. रविवारी या फेरीतील पहिल्या तीन एकांकिकांचे सादरीकरण झाले.
तत्पूर्वी भरत नाट्य मंदिरचा परिसर तरुणाईच्या उत्साहाने ओसंडून वाहत होता. मॉडर्न कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या ‘वाटसरू’ या एकांकिकेने स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर जी. एच. रायसोनी महाविद्यालयाची ‘ती पहिली रात्र’ आणि मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाची ‘गाव चोरांचं’ ही एकांकिका झाली.
एकांकिकेची गरज नसताना नेपथ्य, संगीताचा अतिवापर होत असल्याच्या कारणास्तव या वर्षीपासून नकारात्मक गुण देण्यात येणार आहेत. याची पूर्वकल्पना स्पर्धकांना देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या तीन एकांकिकांमध्ये या बाबींवर कटाक्षाने लक्ष दिल्याचे पाहायला मिळाले. प्राथमिक फेरीसाठी अंजली धारू, राहुल देशपांडे आणि मिलिंद जोगळेकर हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
(प्रतिनिधी)