प्रशिक्षणासाठी बीईजी सक्षम
By Admin | Updated: June 21, 2016 00:37 IST2016-06-21T00:37:28+5:302016-06-21T00:37:28+5:30
लष्कराच्या विविध मोहिमा तसेच आपत्कालिन परिस्थितीत देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) सक्षम असल्याचे दिसून आले.

प्रशिक्षणासाठी बीईजी सक्षम
पुणे : लष्कराच्या विविध मोहिमा तसेच आपत्कालिन परिस्थितीत देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) सक्षम असल्याचे दिसून आले. याठिकाणी जवानांना अतिशय खडतर असे प्रशिक्षण दिले
जात असल्याचे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाची माहिती
देताना ब्रिगेडियर धीरज मोहन यांनी दिली.
नौसा, आर्मी पब्लिक स्कूल व केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी प्रशिक्षण घेतलेल्या या संस्थेला पत्रकारांनी सोमवारी भेट दिली. लष्कराची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या मुलांना सलग ९४ आठवडे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनविले जाते. अशा प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघालेले जवान त्यानंतर देशसेवेसाठी तयार असतात.
ब्रिगेडियर मोहन म्हणाले, ‘‘आतापर्यंत या संस्थेमध्ये ३२ हजार जवानांनी प्रशिक्षण घेत लष्करामध्ये अतिशय चोख कामगिरी बजावली आहे. संस्थेचे काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असून, लष्करी प्रशिक्षण देणे हीच संस्थेची मुख्य ओळख आहे. लष्करातील जवानांना शिपाई म्हणून संबोधले जाते, बीईजीमधील जवानांना सॅपर्स म्हणून संबोधले जाते. लष्कराच्या तळावर काम करत असतानाही शत्रूने पेरलेल्या भूसुरुंगांचा शोध घेणे आणि भूसुरुंग निकामी करण्याचे प्रशिक्षण हा या प्रशिक्षणातील महत्त्वाचा भाग
आहे.’’
येथील विद्यार्थी क्रीडाक्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत असून, रोइंगमध्ये दत्तू भोकर आणि नेमबाजीत गुरुप्रीत सिंग हे २०१६च्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. याबरोबरच सीमाभागातील रस्त्यांची उभारणी, पुलांची बांधणी करणे ही कामेही हे जवान कौशल्याने पूर्ण करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)