गुरुच्या प्रदेशाचे रहिवासी व्हावे
By Admin | Updated: February 7, 2017 03:13 IST2017-02-07T03:13:43+5:302017-02-07T03:13:43+5:30
घराण्याची मूल्ये संक्रांत होतात, तेव्हा गुरुच्या ‘फ्रेझेस’ गायच्या नसतात तर ते ज्या प्रदेशातून येतात त्याचे रहिवासी आपण व्हायचे असते

गुरुच्या प्रदेशाचे रहिवासी व्हावे
पुणे : घराण्याची मूल्ये संक्रांत होतात, तेव्हा गुरुच्या ‘फ्रेझेस’ गायच्या नसतात तर ते ज्या प्रदेशातून येतात त्याचे रहिवासी आपण व्हायचे असते, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी ‘स्वान्त सुखाय’ गाणं बांधत राहावं, असा सल्ला नवोदित कलाकारांना दिला.
बुकगंगा पब्लिकेशन्सच्या वतीने गायक श्रीकांत पारगावकरलिखित ‘मनी जे दाटले’ या पुस्तकाचे प्रकाशन पं. देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वीणा देव, तसेच बुकगंगाचे मंदार जोगळेकर व लेखक श्रीकांत पारगावकर उपस्थित होते.
भेंडीबाजार घराणे हे सुगम संगीतासाठी पोषक आहे, मध्यलयीत गाणं फुलवणं खूप अवघड गोष्ट आहे. शास्त्रीय संगीतात ‘ख्याल’ टिकून राहतो, असे सांगून पं. सत्यशील देशपांडे म्हणाले, की सुगम आणि शास्त्रीय संगीतात काय फरक आहे असे विचारले जाते. शास्त्रीय संगीत गायकीच्या नावाखाली ‘साँग मेलडी’ सादर केली जाते, मात्र ते सूर इतके ताणले जातात, की त्याच्यामध्ये लवचिकपणाच राहत नाही. कठोर व्यंजनामुळे स्वरांच्या आत्म्याला इजा होऊ शकते. गायकाच्या अंतरंगात लय आणि ताल असेल तर निर्मनुष्य जगातही तो स्वत:ची वेगळी जागा निर्माण करू शकतो. गायक शब्दांचा भाषिक अर्थाखेरीज नक्वी म्हणून वापर करतो. या वेळी गाण्यांमधील बदलत्या शब्दशैलीसह ‘प्रायोजक’ या संकल्पनेवर त्यांनी टीका केली. गाण्यांमधील भाषासौंदर्य आज नष्ट होत चालले आहे. ‘इस तरह मेरे खयालों में आया नहीं करते’ या शब्दांच्या नजाकतीतून गाण्याला अर्थ प्राप्त व्हायचा. पण आज ‘तुम मेरे खयालोंमे क्यूँ आते हो? असा जाबच विचारला जातो.’ ‘प्रायोजक’ ही जमात शक्तिप्रदर्शनासाठी असते त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये गायकांसाठी गाणं फुलविणारे वातावरण नसते.
डॉ. वीणा देव म्हणाल्या, की एका विकसित कलावंताचे हे आत्मकथन आहे. कलावंताला स्वत:लाच घडवायचे असते तो कसा घडला याचा वस्तुपाठ या पुस्तकात पाहायला मिळतो. डॉ. जब्बार पटेल यांनी ‘घाशीराम कोतवाल’चा बंगालमध्ये झालेला पहिला प्रयोग आणि त्यात श्रीकांत पारगावकर यांना गायनाची मिळालेली संधी याची आठवण कथन केली. श्रीकांत पारगावकर यांनी लेखकाची भूमिका विशद करताना आजच्या संगीतावर त्यांनी भाष्य केले. सध्याच्या संगीताबद्दल नकारात्मक सूर आळविला जातो. या संगीतामुळे हे नव्या दमाचे कलाकार दिशाहीन वाटतात. पण त्यांच्या संगीतातही प्रयोगशीलता आहे. पाडगावकर, फडके यांच्या नजरेतून त्यांच्याकडे पाहिले तर अन्याय ठरेल.’’ अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले.