सावधान... पुण्यावर सीसीटीव्हींची नजर

By Admin | Updated: August 9, 2015 03:59 IST2015-08-09T03:59:02+5:302015-08-09T03:59:02+5:30

पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही मॉनिटरिंग रूममधून एका सहायक आयुक्तासह तीन अधिकारी आणि तब्बल २५ प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची पुणे

Be careful ... look at CCTV in Pune | सावधान... पुण्यावर सीसीटीव्हींची नजर

सावधान... पुण्यावर सीसीटीव्हींची नजर

पुणे : पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही मॉनिटरिंग रूममधून एका सहायक आयुक्तासह तीन अधिकारी आणि तब्बल २५ प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे रस्ते, चौक आणि संवेदनशील ठिकाणांवर करडी नजर राहणार आहे़ सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागणारे ‘स्ट्रीट क्राईम’, बॉम्बस्फोट, खून, घरफोड्या, अपघात, सोनसाखळी चोऱ्यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासासोबतच वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना या सीसीटीव्ही प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे.

तब्बल २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. १३ आॅगस्ट २०१० रोजीचा जर्मन बेकरीचा बॉम्बस्फोट उघडकीस आणण्यात आणि त्यामागे इंडियन मुजाहिदीनचा यासिन भटकळ असल्याचे सीसीटीव्हीमुळेच उघडकीस येऊ शकले होते.
त्यानंतर १ आॅगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रस्त्यावर साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. २० आॅगस्ट २०१३ रोजी महर्षी वि. रा. शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात येत होती.
राज्य शासनाने पुण्यामध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून या कामाला सुरुवातही केली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या अधिकाऱ्यांसह संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी वारंवार बैठका घेऊन हे काम शेवटी मार्गी लावले. पुणेकरांची सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे या सीसीटीव्ही प्रकल्पाला वेगळे महत्त्व आले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये बसवण्यात आलेल्या १२५० कॅमेऱ्यांची ‘झूम क्वालिटी’ उत्कृष्ट दर्जाची आहे.
पोलीस आयुक्तालयामध्ये मुख्य नियंत्रण कक्ष (मॉनिटरिंग रूम) तयार करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षासाठी पोलीस निरीक्षक सीमा मेहेंदळे, सहायक निरीक्षक शैलजा बोबडे यांच्यासह २५ प्रशिक्षित आणि अनुभवी पोलीस कर्मचारी २४ तास लक्ष ठेवून असणार आहेत. या नियंत्रण कक्षासाठी सहायक पोलीस आयुक्त मोहन मोहाडीकर यांचे पर्यवेक्षण राहणार आहे.

वाहतूक नियमभंगाच्या दररोज १५० केसेस
सीसीटीव्हीद्वारे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून, दिवसाला साधारणपणे १५० वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या बेदरकार वाहनचालकांचे फुटेज आरटीओकडे पाठवण्यात येते. आरटीओमार्फत या वाहनचालकांकडून चलन फाडण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त मोहन मोहाडीकर यांनी दिली.

कसे ठेवले जाणार लक्ष?
मॉनिटरिंग रूममध्ये साधारणपणे १० बाय २० फुटांची ‘व्हिडिओ वॉल’ बसवण्यात आली आहे. या व्हिडिओ वॉलवर ८ मोठ्या स्क्रिन एकाच वेळी बघता येतात. हवी ती स्क्रिन मोठी करून पाहता येते. कॅमेऱ्यांची झूम क्वालिटी उत्कृष्ट असल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या छातीवरची नेमप्लेटही वाचता येऊ शकते. यासोबतच कक्षामध्ये २० संगणकांवर पोलीस कर्मचारी कायम लक्ष ठेवणार आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. शिक्षणाचे माहेरघर, उद्योगनगरी, आयटी सिटी, चित्रपट निर्मिती अशा क्षेत्रांत पुणे अग्रेसर आहे. शहराचा पसारा वाढत असताना, नागरिकांच्या समस्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी ही सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. स्मार्ट पोलिसिंगची संकल्पना यामधून साध्य होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पाठपुराव्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित झाली. मुंबईच्या एका परिमंडळात नोव्हेंबरपर्यंत तर संपूर्ण मुंबईत पुढील वर्षीच्या आॅक्टोबरपर्यंत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पोलिसांच्या पारंपरिक कार्यपद्धतीबरोबरच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, त्याचा वापर गुन्हे रोखण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासासाठी करणे आवश्यक झाले आहे. बदलत्या काळात पोलिसिंगचे संदर्भही बदलत चालले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही प्रकल्प हा पोलिसांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.
- के. के. पाठक (पोलीस आयुक्त, पुणे)

Web Title: Be careful ... look at CCTV in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.