पालिकेच्या रुग्णालयांत टॅमीफ्लूचे सरसकट वाटप
By Admin | Updated: March 3, 2015 01:12 IST2015-03-03T01:12:03+5:302015-03-03T01:12:03+5:30
औषधांचा कोर्स अर्धवट सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत या औषधांना स्वाइन फ्लूचे विषाणू न जुमानण्याची भीती निर्माण झाली आहे.

पालिकेच्या रुग्णालयांत टॅमीफ्लूचे सरसकट वाटप
पुणे : पुण्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण लाहे. त्यामुळे सर्दी-खोकला, घसादुखी होताच नागरिक दवाखान्यांकडे धाव घेत आहेत. त्यापैकी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत असलेल्यांना टॅमीफ्लू औषधे देणे गरजेचे असताना पालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांना सरसकट या औषधांचे वाटप केले जात आहे. त्यामुळे रुग्णांकडून औषधांचा कोर्स अर्धवट सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत या औषधांना स्वाइन फ्लूचे विषाणू न जुमानण्याची भीती निर्माण झाली आहे.
दिवसाकाठी दोन हजारांपर्यंत रुग्ण रोज स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये जात आहेत. प्रत्येक रुग्णाची पूर्ण तपासणी करून त्यात स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून येत असली, तर प्रतिबंधात्मक टॅमीफ्लू औषधे रुग्णाला देण्याची सूचना आहे. मात्र, प्रत्यक्षात पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना सरसकट टॅमीफ्लू दिली जात आहेत. यामुळे थोडे बरे वाटताच रुग्ण मध्येच औषध घेणे बंद करीत आहेत. यामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंमध्ये या औषधांविरोधात प्रतिरोध निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
याबाबत राज्य आरोग्य विभागाच्या सहसचांलिका डॉ. कांचन जगताप म्हणाल्या, ‘‘रुग्णांनी या औषधांचा पूर्ण कोर्स केला नाही, तर स्वाइन फ्लूच्या विषाणूंमध्ये या औषधांविरोधात प्रतिरोध निर्माण होण्याचा धोका आहे.’’
खासगी डॉक्टरच्या पिस्क्रिप्शनवर कोणतीही विचारणा न करता टॅमीफ्लू औषधे देत असल्याचे चित्र नायडू रूग्णालयात दिसून येत आहे.
मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ
४सन २००९ मध्ये स्वाइन फ्लूने थैमान माजविल्यानंतर केंद्र शासनाने स्वाइन फ्लूच्या उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती.
४यामध्ये ज्या रुग्णांना स्वाइन फ्लू झाला आहे व ज्यांना होण्याची शक्यता आहे अशांनाच केवळ औषधे देण्यात यावीत, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, पालिकेने सरसकट सर्वांना औषधे देऊन या मार्गदर्शकत तत्त्वांनाच हरताळ फासला आहे.
स्वाइन फ्लूची
लक्षणे व प्रसार
४सर्दी-खोकला, अंगदुखी, ताप, घसा दुखणे
४आजारी व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून प्रसार
४मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, दमा, फुफ्फुस-मुत्रपिंड आजाराच्या व्यक्तींना अधिक धोका
४गर्भवती, लहान मुले, लठ्ठ व्यक्तींनाही धोका
आजार टाळण्यासाठी
४हात साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार धुवा
४पौष्टिक आहार घ्या
४लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा
४पुरेशी झोप व विश्रांती घ्या
४भरपूर पाणी प्या
४शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रूमाल धरा
४लक्षणे दिसताच विनाविलंब डॉक्टरांकडे जा