बार्टीच्या महासंचालकांची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST2021-01-13T04:22:06+5:302021-01-13T04:22:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) नवनियुक्त महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी पदभार ...

Barty's Director General's campaign | बार्टीच्या महासंचालकांची धडक मोहीम

बार्टीच्या महासंचालकांची धडक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) नवनियुक्त महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी पदभार स्वीकारल्यापासून कामाचा धडाका सुरु केला आहे. जात पडताळणी विभागात कामात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जात पडताळणी विभागास अचानक भेट देऊन कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन क्लास वन अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे.

शाळा-महाविद्यालये हळूहळू सुरु होत आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, वांद्रे कार्यालयातून ते देण्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार आली होती. त्यामुळे वांद्रे येथील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात अचानक भेट देऊन गजभिये यांनी दोन क्लास वन महिला अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. समितीच्या संशोधन अधिकारी व सदस्य सचिव सुनीता मते आणि उपायुक्त व नियंत्रक अधिकारी सलिमा तडवी अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. जात पडताळणी प्रमाणपत्रे देताना कार्यालयीन कार्यपद्धतीचा अवलंब केला जात नाही, गैरप्रकार होत असल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याचा ठपका महासंचालकांनी ठेवला आहे. याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही धडक मोहीम राबविली. या समितीच्या कामकाजाची चौकशी करण्यात येणार असल्याचे गजभिये यांनी सांगितले. कार्यमुक्त केलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा कार्यभार मुंबई शहर समितीच्या संशोधन अधिकारी ममता शेरे आणि उमेश सोनवणे यांच्याकडे सोपविला आहे.

लोकहिताच्या दृष्टीने काम करा

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य, सचिव व अध्यक्ष यांच्यासह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जात पडताळणीची कामे तत्काळ मार्गी लावावीत. सर्व समित्यांनी त्यांचे कार्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने करावे. कुणालाही प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. सर्व समित्यांचे सदस्य, सचिव व अध्यक्ष यांनी आपल्या स्तरावर योग्य कार्यवाही करून समितीचे कार्य अधिकाधिक लोकाभिमुख होईल असे पहावे, असे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी म्हटले आहे.

Web Title: Barty's Director General's campaign