बारामतीचा पारा ३८.५ अंशांवर
By Admin | Updated: March 23, 2016 01:06 IST2016-03-23T01:06:03+5:302016-03-23T01:06:03+5:30
शहरातील तापमानाचा पारा ३८.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी तापमान ३७.५ होते. दिवसेंदिवस तापमानाची तीव्रता वाढतच आहे

बारामतीचा पारा ३८.५ अंशांवर
बारामती : शहरातील तापमानाचा पारा ३८.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी तापमान ३७.५ होते. दिवसेंदिवस तापमानाची तीव्रता वाढतच आहे. त्यामुळे आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
मार्च महिन्यातच उन्हाचा चटका बसू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे वातावरणात असह्य उकाडा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी ३५ ते ३६ अंश सेल्सिअस असणारे तापमान आता ३८.५वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा पारा तापमानाची तीव्रता दर्शवितो.
दुपारी रस्ते पडतात ओस...
उन्हाचा चटका बसू लागल्याने दिवसा शहरातील रस्ते ओस पडत आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी पांढरी टोपी, गॉगल यांना मागणी वाढली आहे. तर, थंडीप्रमाणे नागरिक चेहरा झाकून घराबाहेर पडत आहेत. उन्हात गेल्यानंतर थंडावा मिळण्यासाठी नागरिक थंड पेयांच्या दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत. त्यातून आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत.
त्वचेला घातक ठरणारी सूर्यकिरणे टाळा
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. राहुल संत यांनी सांगितले, की दुपारी १२ ते ४ या कालावधीत त्वचेला घातक ठरणारी सूर्यकिरणे बाहेर पडतात. या काळात शक्य असल्यास बाहेर पडणे टाळावे. घराबाहेर पडताना पूर्ण गोलाकार असणारी हॅट वापरावी. चेहऱ्याबरोबरच उन्हाने मानेवर व्रण उठतात याची दक्षता घ्यावी. चेहऱ्याला २० प्लस एसपीएफ असणारे सनस्क्रीन लोशन वापरावे. १० ते १२ ग्लास पाणी शरीरात जाणे आवश्यक आहे. फळे, शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करावा. स्विमिंग टँकमध्ये क्लोरीन असते.
अशुद्ध पाण्यामुळे आजारांत वाढ
डॉ. संग्राम देवकाते यांनी सांगितले, की पाण्याची पातळी सर्वत्रच घटली आहे. त्यामुळे अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. परिणामी सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. तर, लहान मुलांमध्ये उलट्या-जुलाबांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी उन्हात घराबाहेर पडणे टाळावे. शुद्ध, भरपूर पाणी पिण्याची दक्षता घ्यावी.
बर्फाचे पदार्थ टाळा
बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांनी सांगितले, की पालकांनी लहान मुलांच्या हट्टाला बळी पडू नये. बर्फाचा गोळा, अशुद्ध असणारे थंड खाद्यपदार्थ लहान मुलांच्या आजारपणाला कारणीभूत ठरतात. नेमक्या याच पदार्थांचा मुले उन्हाळी सुट्टीत आग्रह धरतात. लहान मुलांना पाणी उकळून द्यावे. नारळपाणी, खडीसाखर, वरणभात, फळांचा घरगुती पद्धतीने बनविलेला ज्यूस आहारात समाविष्ट करावे.
ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी
डॉ. चंद्रकांत पिल्ले यांनी सांगितले, की ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. शरीरातील पाणी कमी झाल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचा धोका असतो. त्यातून मेंदूला, हृदयाला रक्तपुरवठा कमी होण्याची भीती असते. ही वेळ टाळण्यासाठी लिंबू सरबत, फळांचा ज्यूस भरपूर प्रमाणात सेवन करावे, भरपूर पाणी प्यावे.