बारामतीला कमळाबाईचा साखरपुडा
By Admin | Updated: March 4, 2015 00:46 IST2015-03-04T00:46:53+5:302015-03-04T00:46:53+5:30
नवी नवी हळद, नवा हिरवा चुडा आहे, १४ फेब्रुवारीला बारामतीला कमळाबाईचा साखरपुडा आहे’

बारामतीला कमळाबाईचा साखरपुडा
कोथरूड : ‘नवी नवी हळद, नवा हिरवा चुडा आहे, १४ फेब्रुवारीला बारामतीला कमळाबाईचा साखरपुडा आहे’ या वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या तसेच ‘ढाल बनून लढताही यावं, सल बनून सलताही यावं, माणूस म्हणून माणसांशी, माणसासारखं बोलताही यावं’ या अस्मिता जोगदंड यांच्या माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निमित्त होते कोथरूड येथील शिक्षकनगरमध्ये जागतिक मराठी भाषा दिन व शब्दश्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित अनुभूती मराठी कविसंमेलनाचे.
नगरसेवक अॅड. चंदू कदम यांनी आयोजित केलेल्या या काव्य मैफलीमध्ये ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, डॉ. अशोक थोरात, प्रकाश होळकर, नारायण सुमंत, शिवाजी सातपुते, प्रकाश घोडके, तुकाराम धांडे, अस्मिता जोगदंड, भरत दौंडकर, रमजान मुल्ला, प्रशांत मोरे आदी प्रसिद्ध कवींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
प्रकाश होळकर यांनी, ‘जगणं जर का सोपं असतं, तर अशी कण्हत कण्हत जगली नसती माणसं’ ही रचना सादर करून रसिकांच्या आग्रहास्तव ‘माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला’ हे गीतदेखील सादर केले.
शिरूर येथील भरत दौंडकर यांनी ‘फाटकी शाळा’ या कवितेतून दगडखाणीत काम करणाऱ्या लहान मुलांचे आयुष्य अतिशय प्रभावीपणे मांडले.
कल्याणचे कवी प्रा. प्रशांत मोरे यांनी ‘दे रे आभाळा दे पाणी’ ही दुष्काळावरील रचना सादर केली. कोरड्या गं हौदापाशी, माझा ज्योतिबा गं उभा, त्याच्या डोळ्यांत जमली, खाऱ्या आसवांची सभा’ हा कवितेचा शेवट ऐकून रसिकांच्या डोळ्यांत देखील पाणी तरळले. (वार्ताहर)
४नाशिकच्या तुकाराम धांडे यांनी ‘भूगोल’ नावाची एक अनोखी कविता सादर केली. अमरावतीहून आलेले डॉ. अशोक थोरात यांनी गझल-फजल-हजल अशा रचना सादर करून रसिकांना मनमुराद हसविले.