Baramati-Phaltan-Lonand railroad: Land acquisition alone costs 48 lakhs | बारामती-फलटण-लोणंद लोहमार्ग: भूसंपादनास एकरी ४८ लाख मोबदला

बारामती-फलटण-लोणंद लोहमार्ग: भूसंपादनास एकरी ४८ लाख मोबदला

बारामती : बारामती-फलटण-लोणंद हा लोहमार्ग एकूण ६७ किमी लांबीचा आहे. त्यापैकी बारामती तालुक्यातून ३७ किमीचा लोहमार्ग जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील ४०० एकर जमिनी संपादन होणार आहेत. एकरी ४८ लाख रुपये भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी ११५ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाकडून मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये भूसंपादनासाठी मिळणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

बारामती-फलटण-लोणंद या नवीन होणाºया लोहमार्गाची भूसंपादन व खरेदी दस्त प्रक्रिया ३१ आॅक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. या भूसंपादनाबाबतच्या प्रक्रियेची सुरुवात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत दुय्यम निबंधक कार्यालयात येथे लाटे माळवाडी या गावातील दिनकर मारुती नाळे यांच्या जमिनीचे खरेदी दस्त करून करण्यात आली. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना निकम म्हणाले, की या लोहमार्गामध्ये बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बºहाणपूर, कटफळ, नेपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, कºहावागज, सावंतवाडी, तांदूळवाडी या गावांचा समावेश आहे. या मार्गावर तीन स्टेशन होणार असून हा लोहमार्ग एकूण ६७ किलोमीटरचा आहे. नेपतवळण, ढाकाळे, लाटे या ठिकाणी रेल्वे स्टेशन विकसित करणत येणार आहेत. या लोहमार्गापैकी ३७ किलोमीटरएवढा परिसर बारामती उपविभागाच्या हद्दीमध्ये आहे. या ३७ किलोमीटर परिसरामध्ये एकूण ४०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या कामासाठी २२५ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी रेल्वे विभागाकडून ११५ कोटी रुपये प्राप्त झाले असून केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये मिळणार आहेत. भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनी खासगी वाटाघाटीने खरेदी करण्यात येणार आहेत.

जमिनीची रक्कम तात्काळ बँक खात्यात होणार जमा
जमिनीची रक्कम तत्काळ संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. भूसंपादन केलेल्या सर्व जमिनी येत्या मार्चअखेरपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहेत. भविष्यात बारामती रेल्वे स्टेशन जंक्शन होणार आहे. या लोहमार्गामुळे नागरिकांची वेळेची व पैशांची बचत होऊन मालवाहतुकीस व शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच आज दिवसभरात एकूण ६५ खरेदी दस्तांचे कामकाज करण्यात येणार असल्याचे निकम यावेळी म्हणाले.

बारामती-फलटण-लोणंद लोहमार्गाच्या बारामती तालुक्यातील ३७ किमी अंतरामध्ये १ हजार २०० बाधितांना मोबदला मिळणार आहे. यामध्ये घर, शेती, झाडे, विहिरी, विंधन विहिरी यांचा समावेश आहे. या बैठकीवेळी काही गावांतील ग्रामस्थांनी भूसंपादनाला विरोध दर्शवला. मात्र या लोहमार्गामुळे पुणे स्टेशनवरील बराचसा ताण कमी होणार आहे. दौंडहून थेट बारामतीमार्गे रेल्वेने दक्षिण भारताशी जोडला जाणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Baramati-Phaltan-Lonand railroad: Land acquisition alone costs 48 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.