Baramati Nagar Parishad Election Result 2025: अखेर गड राखला; बालेकिल्ल्यावर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:34 IST2025-12-21T16:30:33+5:302025-12-21T16:34:26+5:30
- ३५ जागांवर अजित पवारांचे वर्चस्व;६ जागांचा निकाल विरोधात; रासप,बसप सह ४ अपक्ष विजयी

Baramati Nagar Parishad Election Result 2025: अखेर गड राखला; बालेकिल्ल्यावर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व
बारामती - हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र, याच बालेकिल्ल्यातील बारामती नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात ६ जागा निवडून आल्या आहेत. ६ जागांवर विरोधात निकाल गेल्याने उपमुख्यमंत्री पवार यांना हा धक्का मानला जात आहे. या निकालाने नगरपरिषदेत शरद पवार गट, रासप, बसपाने ‘एन्ट्री’ केली आहे. तर इतर ३ अपक्ष निवडून आले आहेत. जातीय समीकरणांसह अंतर्गत नाराजी या विरोधातील निकालामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना, बहुजन समाज पार्टीसह १४ उमेदवार, तर ३३ जागांसाठी १५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
अजित पवार गटाचे यापूर्वीच आठ नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले होते. आज पार पडलेल्या मतमोजणीत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अजित पवार गटाचे २७ उमेदवार निवडून आले आहेत. अजित पवार गटाने एकूण ३५ जागा जिंकल्या आहेत.
निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांच्या पत्नी वनिता अमोल सातकर या प्रभाग ५-ब मधून निवडून आल्या. तसेच बहुजन समाज पार्टीचे महासचिव काळुराम चौधरी यांच्या कन्या संघमित्रा चौधरी या प्रभाग १४-अ मधून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षा आरती शेंडगे गव्हाळे या प्रभाग १३-अ मधून, तसेच प्रभाग २० मधून माजी नगरसेवक निलेश इंगुले, तसेच प्रभाग १०-ब मधून मनिषा बनकर या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांच्या विरोधात निवडून आल्या.
९ वर्षांनंतर बारामती नगरपरिषदेची निवडणूक पार पडली. २०१७ मध्ये बारामती नगरपरिषदेच्या ४ जागा विरोधात गेल्या होत्या. यंदा २ जागांची वाढ होऊन एकूण ६ विरोधी नगरसेवक निवडून आले आहेत. दरम्यान, महायुतीतील भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच उबाठा गटाला एकही जागा मिळू शकलेली नाही.