बंडोबांना सर्वच पक्षांनी थोपवले!
By Admin | Updated: February 7, 2017 02:59 IST2017-02-07T02:59:19+5:302017-02-07T02:59:19+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवसअखेर गटांसाठी ८७७, तर गणांसाठी १,५५१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली

बंडोबांना सर्वच पक्षांनी थोपवले!
पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवसअखेर गटांसाठी ८७७, तर गणांसाठी १,५५१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचे उमेदवार जाहीर न करण्याची खेळी यशस्वी झाली असून, बंडोबांना थोपविण्यात यश आले आहे. असे असले, तरी उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांची नाराजी दूर करणे व त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडणे, हे आता पक्षांसमोरील मोठे आवाहन असेल.
जिल्ह्यात सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार आहेत. असे असले तरी जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पेरणे वाडेबोल्हाई या गटात मात्र राजकारणाचे वेगळे समीकरण पुढे आले आहे. या गटात राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली असून त्यांचा एकच उमेदवार दिला आहे. तसेच शिरूर तालुक्यातील शिक्रापूर-सणसवाडी या गटातही फक्त भाजपाने उमेदवार दिला असून येथे भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे. या गटातही राष्ट्रवादी विरूद्द सर्वपक्षीय आघाडी झाली आहे.
बारामतीत जवळपास सर्वच नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. विशेष म्हणजे भाजप, रासप, आरपीआय ही निवडणूक एकत्र लढत आहेत. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिकराव काळे यांना भाजपने थेट उमेदवारीच दिल्याने ‘युतीला’ धक्का बसला. राष्ट्रवादीला वडगाव निंबाळकर- मोरगाव गटात बंडखोरीचे ग्रहण आहे.
इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बंडाळी झाल्याने तालुक्यावर सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी माध्यमांकडे देता आली नाही. पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पत्रकारांसमोर अक्षरश: हात जोडले. दौंडला उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांची एकच धावपळ झाली. दरम्यान काही उमेदवार इतर राजकीय पक्षांच्या हाती लागल्याने त्यांना उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत बंडखोरीचे प्रमाण बऱ्यापैकी राहणार असल्याचे एकंदरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांमध्ये बोलले जात होते. काही उमेदवारांनी पक्ष श्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत बंडाचा झेंडा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही राजकीय पक्षांनी ऐकमेकाशी जुळते घेऊन स्थानिक पातळीवर युती केली आहे.
भोरला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन तासांत बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडून अनेकांनी पक्षांतर करून उमेदवारी मिळवली आहे. यामुळे माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अनेक उमेदवारांनी पक्षांतर करून उमेदवारी मिळवली, तर काहींना गप्प बसावे लागले.
मुळशी तालुक्यात कासारआंबोली व माण गणात शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली आहे. कासारआंबोली गणात स्थानिय लोकाधिकार समिती पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे यांना सेनेने नाकारल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरून सेनेपुढे मोठे आव्हान ठेवले आहे. तर भाजपाचे निष्ठावान संपर्कप्रमुख हनुमंत सुर्वे यांनी कासारआंबोली गणात मनसेकडून उमेदवारी अर्ज भरून भाजपाविरूद्ध बंड पुकारले आहे. तर माण गणात शिवसेनेच्या रामचंद्र देवकर यांनी बंडखोरी करून भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.
पुरंदर तालुक्यात इछुकांची दुपारी तीन वाजेपर्यंत मोठी घालमेल सुरू होती. अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर आपली अपक्ष उमेदवारी ठेवणार असल्याचे आपआपल्या पक्ष नेतृत्वाला सुनावत होते.
जुन्नर तालुक्यात पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. तर काहींनी थेट पक्षांतर करून दुसऱ्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे सर्वच पक्षात कमीअधिक प्रमाणात नाराजीनाट्य दिसून आले.
शिरूरला उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनामुळे तहसील कार्यालय परिसरात समर्थकांची तसेच वाहनांची चांगलीच गर्दी झाली. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली नाही. यामुळे त्यांनी लोकशाही क्रांती आघाडी स्थापन करून या आघाडीकडून पत्नी रेखा बांदल यांचा तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
खेड तालुक्यात इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती झाली. सर्वात जास्त नाराजी निष्ठावंतांना डावलल्यामुळे शिवसेनेमध्ये झाली. आंबेगाव तालुक्यात शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरले. (प्रतिनिधी)
कोरेगाव भीमा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा-शिवसेना स्वतंत्रपणे सर्व जागा लढविणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून जाहीर झालेले असूनही पेरणे-वाडेबोल्हाई गटात भाजपासह शिवसेनेनेही उमेदवारच दिलेला नाही, तर शिवसेनेने शिक्रापूर, रांजणगाव गटांत उमेदवार न दिल्याने शिरूर-हवेलीत भाजपा-शिवसेनेची अंतर्गत युती असल्याचे चित्र निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे.
पेरणे-वाडेबोल्हाई गटातून भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्षाने शंभुराजे बोल्हाईमाता विकास आघाडी स्थापन करून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पै. संदीप भोंडवे यांच्या पत्नी जयश्री यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी, तर पेरणे गणातून सुजाता नीलेश वाळके, वाडेबोल्हाई गणातून श्याम परिलाल गावडे यांना उमेदवारी दिल्याने भाजपाची शिवसेनेशी छुपी युती असल्याचे चित्र शिरूर-हवेलीत पाहण्यास मिळणार आहे. तर, ही युती निवडून येण्यासाठी करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येत आहे.
शिक्रापूर गटातून कुसुम बाळासाहेब खैरे यांना अपक्ष उमेदवार म्हणून सर्वपक्षीय पाठिंबा देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ऐन वेळी भाजपाने शिवसेनेला अंधारात ठेवून श्रीमती खैरे यांनाच पक्षाची उमेदवारी दिल्याने शिवसेनेचा उमेदवार आम्हाला टाकण्यात आले नसल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद यांनी सांगितले.
इंदापूरला माजी आमदार कै . राजेंद्रकुमार घोलप यांच्या सून, नातू काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रिंगणात उतरले आहेत. छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या पत्नी वंदना यांनी जिल्हा परिषदेसाठी, तर त्यांचा मुलगा करणसिंह यांनी पंचायत समिती गणासाठी आज अर्ज दाखल केला.
पाटस-खडकी गटात
सख्या दोन जावांमध्ये लढत
राष्ट्रवादीकडून सारिका पानसरे या खडकी-
पाटस गटातून तर रासपा-भाजपा यांच्याकडून याच गटात भारती पानसरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान सारिका पानसरे आणि भारती पानसरे या सख्या जावा एकाच गटातून निवडणूक लढवत आहेत.
शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद सुर्यवंशी हे
लिंगाळी - मलठण गटातून निवडणूक
लढवत आहेत.
पत्नी मनिषा सुर्यवंशी या मलठण गणातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.