"मार्केटयार्डात किरकोळ विक्रेत्यांना बंदी", गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने उचलले कठोर पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:18 PM2021-04-18T18:18:09+5:302021-04-18T18:18:46+5:30

पास असेल तरच बाजारात प्रवेश

"Ban on retailers in the market yard", the administration took drastic steps to reduce the crowd | "मार्केटयार्डात किरकोळ विक्रेत्यांना बंदी", गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने उचलले कठोर पाऊल

"मार्केटयार्डात किरकोळ विक्रेत्यांना बंदी", गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने उचलले कठोर पाऊल

googlenewsNext
ठळक मुद्देबाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ३० पोलिस कर्मचारी तैनात

पुणे: पुणे महापालिकेने सोमवार ते शुक्रवार जमावबंदी लागू केली असून त्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सकाळच्या वेळेत मार्केटयार्डमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी होणाऱ्या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. 

बाजारातील किरकोळ विक्रेते, डमी व लिंबू विक्रेत्यांवर सोमवारपासून बंदी घालण्यात आली आहे. रिक्षाला प्रवेश दिला जाणार नसून पास असेल, तरच बाजारात प्रवेश दिला जाणार आहे. किरकोळ विक्रीही थांबवण्यात आली आहे. आडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास दिले जातील. प्रवेशद्वारावर ओळखपत्र आणि पास दाखविल्याशिवाय बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

गरड म्हणाले, सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी बाजाराची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. बाजारात सुमारे दोन हजार डमी विक्रेते आहेत. हे विक्रेते गाळ्यासमोर थांबून विक्री करत असतात. हे डमी किरकोळ विक्री करत असल्याने ग्राहकांचीही गर्दी होते. त्यामुळे डमी तसेच लिंबू विक्रेत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. आडत्यासह चार पास दिले जाणार आहेत. तसेच खरेदीसाठी येणार्‍यांनाही पास दिला जाणार आहे. शेतीमाल माल घेऊन येणार्‍या गाड्यांना एक नंबरच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे, तर खरेदीदारांच्या गाड्यांना 4 नंबरच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार असल्याचेही गरड यांनी नमुद केले.

पास असेल, तरच वाहनतळावर वाहन लावण्यास परवानगी दिली जाणार आहे. बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि वाहतूक पोलिस संयुक्तरित्या गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करणार आहेत. बाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ३० पोलिस कर्मचारी असणार आहेत. नियम मोडणार्‍यांवर हे पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत. किरकोळ खरेदी करणार्‍यांना प्रवेश दिला जाणार नसल्याने मार्केटयार्डातील गर्दी कमी होणार आहे. गुळ-भुसार विभागातही शनिवारी तसेच रविवारी माल घेऊन येणार्‍या गाड्यांना त्या त्या गाळ्यासमोर थांबण्याची परवानगी दिली आहे. मात्र सोमवारी दुपारी १२ नंतर या गाड्यांतील माल उतरवून घेता येणार असल्याचेही मधुकांत गरड यांनी सांगितले.

नियम मोडाल तर कारवाई

मार्केट यार्डातील विविध विभागात माल घेऊन येणार्‍यांची संख्या मोठी आहे. तसेच खरेदी करणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाळीनुसार पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे पोलिस बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत. सोमवारपासून मार्केटयार्डात नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. 

सर्व रस्त्यांवर बॅरिगेटस्

मार्केटयार्डात येणार्‍या रस्त्यांवर सोमवारपासून बॅरिगेटस् लावण्यात येणार आहेत. बिबवेवाडी रस्ता, शिवनेरी रस्ता, पोस्ट ऑफीस कार्यालयासह छोट्या रस्त्यांवरही बॅरिगेटस लावले जाणार आहेत. शिवनेरी रस्त्यासह अन्य रस्त्यांवरून बाजारात येणार्‍या रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून पास असेल, तरच मार्केटयार्डातील विविध विभागात प्रवेश दिला जाणार आहे. अन्यथा मार्केटयार्डात जाणार्‍यांना रिकाम्या हातानी परतावे लागणार आहे.

Web Title: "Ban on retailers in the market yard", the administration took drastic steps to reduce the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.