वराळेत निघाली बालवारकऱ्यांची दिंडी
By Admin | Updated: July 3, 2017 02:11 IST2017-07-03T02:11:26+5:302017-07-03T02:11:26+5:30
आषाढी एकादशी आणि कृषिदिनाचे औचित्य साधत कृषिदिंडी आणि ज्ञानेश्वर, तुकारामांच्या नामाचा गजर करीत काढण्यात आलेल्या

वराळेत निघाली बालवारकऱ्यांची दिंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेठाण : आषाढी एकादशी आणि कृषिदिनाचे औचित्य साधत कृषिदिंडी आणि ज्ञानेश्वर, तुकारामांच्या नामाचा गजर करीत काढण्यात आलेल्या बालवारकऱ्यांच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
वराळे येथील लर्निंग ट्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून ही बालवारकऱ्याची दिंडी काढण्यात आली होती. जगद्गुरु संत तुकाराममहाराज, ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत नामदेव यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी व जनसामान्यांच्या प्रबोधनासाठी पूर्वापार चालणारी दिंडीची प्रथा व महत्त्व विद्यार्थ्यांना या वयात समजावे तसेच संतांचे कार्य व त्यांचे विचार व त्यांनी लिखाण केलेले साहित्य यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी शाळेमध्ये सामूहिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडी सोहळ्यात तिसरी ते आठवी वर्गातील ३२५ विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक पालखी बनवली होती. अनेक विद्यार्थी हे वारकरी व टाळकरी बनून आले होते. दिंडी सोहळ्यात पर्यावरणाचे व जनजागृतीचे फलक दाखवून समाजहित व राष्ट्रहित जोपासण्याचा सामाजिक संदेश दिला. तसेच स्त्रीभ्रूणहत्या करू नये यासाठीचे फलकदेखील या वेळी दाखवण्यात आले. या दिंडीत विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या भूमिका केल्या. त्यामध्ये अनेक विद्यार्थी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा तसेच विठ्ठल व रुख्मिणी यांची वेशभूषा करून आले होते.
सोहळ्यात वराळे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पुरुष व विशेषकरुन महिला भगिनी उपस्थित होत्या. या वेळी उपस्थित वराळे ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्यात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करुन सर्वांना प्रसाद व खाऊचे वाटप केले. या दिंडी सोहळा कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आंनदाचे व उत्साहाचे वातावरण होते. सोहळ्याचे यशस्वी नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता बुट्टेपाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी केले.
टाळ-मृदंग अन् विठूनामाचा गजर
ढोल, ताशे, चिपळ्या, तुळशीवृंदावन, पताका, वीणा, टाळ व मृदंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करत आकर्षक असे गोल रिंगण बनवत फुगड्या खेळत, भगवंताच्या आरत्या म्हणत दिंडी सोहळा गावात साजरा झाला.