भूमी अभिलेखाचे बाळासाहेब वानखेडेकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST2021-05-15T04:08:59+5:302021-05-15T04:08:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपसंचालकासह त्यांच्या पत्नीकडे ८८ लाख ८५ हजार ५८७ रुपयांची बेहिशोबी ...

भूमी अभिलेखाचे बाळासाहेब वानखेडेकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपसंचालकासह त्यांच्या पत्नीकडे ८८ लाख ८५ हजार ५८७ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या व कुटुंबीयांच्या नावाने पुणे, मुंबई, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मालमत्ता आहे. त्यांच्या राहत्या घरासह या ठिकाणची विभागाकडून झडती घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बाळासाहेब वामनराव वानखेडे (वय ५८, तत्कालीन उपसंचालक सेवानिवृत्त भूमी अभिलेख) आणि उषाकिरण बाळासाहेब वानखेडे (वय ५४) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. तीन वर्षांपूर्वी जमिनीच्या वादामध्ये तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी ॲड. रोहित शेंडे या वकिलाच्या संगनमताने १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणात वानखेडे हे आरोपी होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांची एसबीकडून चौकशी सुरू केली होती. वानखेडेंच्या सांगण्यावरूनच लाच स्वीकारल्याचे ॲड. शेंडे याच्याकडे केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर वानखेडे देखील या गुन्ह्यात आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार त्यांच्याकडे ८८ लाख ८५ हजार ५८७ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. चौकशीअंती वानखेडे दाम्पत्यावर बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त विजयमाला पवार करीत आहेत.