bag were stolen in yashwantro chavan theatre | नाट्यगृहांमध्ये सामान हाेतंय 'गुल'
नाट्यगृहांमध्ये सामान हाेतंय 'गुल'

पुणे : पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या मंचावरुन कलाकारांच्या सामानाची चाेरी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समाेर आले असून यात एक अनाहुत व्यक्ती कलाकारांची एक बॅग घेऊन जात असल्याचे दिसत आहे. कार्यक्रम सुरु हाेण्याआधी आणि कार्यक्रम संपल्यावर अनेक लाेक मंचावर व बॅकस्टेजला येत असल्याने कलाकारांनी सामानाची खबरदारी घेणे आवश्यक आहे. 

पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुण्यात महापालिकेची तसेच खासगी अनेक नाट्यगृह आहेत. शहरात दरराेज अनेक कार्यक्रम हाेत असतात. कार्यक्रम सुरु हाेण्याआधी तसेच कार्यक्रम संपल्यानंतर कलाकारांची तसेच बॅकस्टेज आर्टिस्ट यांची धावपळ हाेत असते. यातच अनेकदा सामानाकडे लक्ष नसते. याच संधीचा फायदा घेऊन सामानाची चाेरी हाेत असल्याचे समाेर आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी एका नृत्याच्या कार्यक्रमाच्या कलाकारांची बॅग चाेरीला गेल्याचे समाेर आले आहे. याबाबतचे सीसीटिव्ही फुटेज समाेर आले असून यात एक व्यक्ती बॅग घेऊन जात असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी अनेकदा घडल्याचे काही कलाकारांनी सांगितले. त्यामुळे कलाकाराच्या सामानाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

याबाबत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे व्यवस्थापक सुनिल मते म्हणाले, ज्या संस्थेचा कार्यक्रम नाट्यगृहात असताे त्या संस्थेला नाट्यगृहाचा ताबा दिला जाताे. अशा घटनांबाबतची तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. परंतु अशा घटना राेखण्यासाठी कलाकारांनी आपले सामान ग्रीन रुममध्ये ठेवणे आवश्यक आहे. कार्यक्रम सुरु हाेण्याआधी अनेकांची रंगमंचावर वर्दळ असल्याने अशा घटना राेखणे अवघड असते. अनेक विभागाचे लाेक एकाचवेळी काम करत असतात. त्यामुळे प्रत्येकाची माहिती ठेवणे अवघड असते. रविवारी घडलेल्या घटनेची तक्रार आली नसली तरी सीसीटिव्ही फुटेज मिळाले आहे. त्या आधारे कारवाई करण्यात येईल. 

बॅकस्टेज आर्टिस्ट असलेले रवी पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण  नाट्यगृहामध्ये सामान चाेरी हाेण्याचे काही प्रकार घडले आहेत. अनेकदा वस्तू गहाळ किंवा चाेरी झाल्यास बॅकस्टेज आर्टिस्टला याबाबत विचारणा केली जाते. कुठलाही बॅकस्टेज आर्टिस्ट चाेरी करणार नाही. परंतु अशा घटनांमुळे अनेकदा संशय बॅकस्टेज कलाकारांवर घेतला जाताे. ही आमच्यासाठी अपमानकारक गाेष्ट आहे. कलाकारांनी तसेच व्यवस्थापनाने सामानाची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच चाेरी करणाऱ्यावर कारवाई करायला हवी. 

अभिनेता साईनाथ गुणवाड म्हणाला, अशा घटना राेखण्यासाठी कार्यक्रमाच्या टीम मधील एका व्यक्तीने सामानाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच कलाकारांनी आपले सामान देण्यात आलेल्या ग्रीन रुम्स मध्येच ठेवायला हवे. तसेच व्यवस्थापनाने कलाकारांना तसेच कार्यक्रमाच्या टीमला सामानाची काळजी घेण्याच्या सुचना द्यायला हव्यात. त्याबाबतचा बाेर्ड देखील लावला तरी त्याबाबत जागृती हाेण्यास मदत हाेईल व अशा घटना राेखता येतील. 


Web Title: bag were stolen in yashwantro chavan theatre
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.