अंदाजपत्रकाला व्याजाचा ‘टेकू’

By Admin | Updated: June 20, 2015 01:11 IST2015-06-20T01:08:36+5:302015-06-20T01:11:24+5:30

महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांत डगमगत असताना पालिकेने विविध बँकांमध्ये गुंतविलेल्या निधीमुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकाला

'Backing' of interest on budget | अंदाजपत्रकाला व्याजाचा ‘टेकू’

अंदाजपत्रकाला व्याजाचा ‘टेकू’

पुणे : महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांत डगमगत असताना पालिकेने विविध बँकांमध्ये गुंतविलेल्या निधीमुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकाला काही प्रमाणात का होईना टेकू मिळत आहे. या गुंतवणुकीमधून महापालिकेला दर वर्षी तब्बल १०० ते १२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
या गुंतवणुकीमध्ये विकासकामांसाठी महापालिकेने ठेकेदारांकडून भरून घेतलेली बयाणा रक्कम, डिपॉझीट तसेच शासनाकडून एकदम आलेल्या थकीत अनुदानांच्या निधीचा समावेश आहे. ठेकेदारांकडून घेतलेले डिपॉझीट त्यांना पाच वर्षांनंतर परत द्यावे लागत असल्याने ही रक्कम पडून न ठेवता बँकेत गुंतविली जात असल्याने महापालिकेला तिच्या व्याजाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळत आहे.
महापालिका शहरात दर वर्षी कोट्यवधी रुपयांची विकासकामे करते. ही कामे करताना ती ठेकेदारांच्या अथवा मोठ्या कंपन्यांकडून करून घेतली जातात. या कामांच्या निविदा भरताना या ठेकेदारांकडून बयाणा रक्कम तसेच कामाच्या निधीच्या स्वरूपात काही रक्कम डिपॉझीट म्हणून ठेवून घेतली जाते. महापालिकेकडून दर वर्षी अशी तब्बल ८०० ते १००० कोटींची कामे करून घेतली जातात. ठेकेदाराकडून घेण्यात आलेली रक्कम महापालिकेकडून पालिकेच्या तिजोरीत पडून न ठेवता राष्ट्रीयीकृत बँका, शासकीय कर्जरोखे यांमध्ये गुंतविली जाते. अशा दर वर्षी तब्बल ७०० ते ८०० कोटींच्या पालिकेच्या ठेवी आहेत. याशिवाय, काही मोठ्या रकमा असल्यास त्याही दीर्घ मुदतीने ठेवल्या जातात. त्यातून महापालिकेला २०१३पासून दर वर्षी तब्बल १०० ते १२५ कोटींचे व्याज मिळाले आहे. हा निधी पालिकेकडून विकासासाठी तसेच कर्जावरील व्याज भरण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे दर वर्षी अंदाजपत्रकात जमा निधीपेक्षा १०० ते २०० कोटींचा जादा खर्च होत असताना, ही व्याजाची रक्कम पालिकेच्या अंदाजपत्रकाला आधार देण्याची भूमिका बजावते. (प्रतिनिधी)

शासनाच्या अनुदानाच्याही ठेवी
- शासनाकडून अनेक सामाजिक योजना तसेच विकासकामांसाठी पालिकेला अनुदान दिले जाते. हे अनुदान दर वर्षी मिळणे अपेक्षित असताना, ते मात्र टप्प्याटप्प्याने चार ते पाच वर्षांतून मिळते. त्यामुळे दर वर्षी महापालिकेला पदरमोड करून या योजना नियमितपणे सुरू ठेवाव्या लागतात. त्यानंतर हे आलेले अनुदान पालिकेला एकगठ्ठा स्वरूपात मिळाल्याने ते तत्काळ खर्ची न पाडता हा निधी ठेवींच्या स्वरूपात गुंतविला जात असल्यानेही पालिकेला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: 'Backing' of interest on budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.