पुणे : नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराची बुधवारी पोलिसांनी झडती घेतली. यावेळी घरातून पोलिसांना रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने, कुलमुखत्यारपत्र, साठेखत अशा गोष्टी मिळून आल्या. बुधवारी (दि. १०) सायंकाळी पाच ते गुरुवारी (दि. ११) पहाटे चारपर्यंत ही घरझडती सुरू होती. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. बंडूने घराच्या शंभर मीटर परिसरात २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पोलिसांनी सांगितले.
५ सप्टेंबर रोजी बंडू आंदेकर याची मुलगी कल्याणी यांचा मुलगा आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणात बंडू आंदेकर यांच्यासह त्याच्या टोळीतील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, वृंदावनी, स्वराज व तुषार (वाडेकर कुटुंबीय) यांच्या घराची झडती घेतली. या झडतीत वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून २१ हजार रोख, १६ मोबाईल, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली, तर टोळीचा म्होरक्या बंडू यांच्या घरातून ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची आजच्या बाजार भावानुसार ८५ लाखांहून अधिक किंमत आहे. ३१ हजार रुपयांची चांदी आणि २ लाख ४५ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली.
बंडू आंदेकरच्या घरात १० पेक्षा अधिक साठेखत, पॉवर ऑफ ॲटर्नी, बँकेचे पासबुक, एक कार, विविध करारनामे, टॅक्स पावत्या, पेनड्राईव्ह इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तब्बल ११ तास पोलिसांकडून ही मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुषच्या खुनाचा तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेकडे तपास वर्ग...खुनाची घटना घडल्यानंतर गुन्हे शाखा आणि समर्थ पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. बुधवारी या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. २२ ऑगस्ट रोजी वनराज आंदेकर यांचे वर्षश्राद्ध...
वनराज आंदेकर यांचा खुनाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. १ सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी बंडू आंदेकर आणि त्याच्या घरच्यांनी २२ ऑगस्ट रोजी तिथीनुसार त्यांचे वर्षश्राद्ध केले होते. त्यानंतर ते केरळ येथे देवदर्शनासाठी गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
आंदेकरच्या घराची पहिल्यांदाच झडती...आयुष कोमकर याच्या खून प्रकरणात मकोका कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच बंडू आंदेकर याच्या घराची पोलिसांनी झडती घेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे.