पुणे : देशातील सर्व विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्राध्यापक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असल्या तरी आॅक्सफर्ड आॅफ ईस्ट म्हणून ओळखले जाणारे पुणे विद्यापीठ मात्र त्या प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ करीत आहे. व्यवस्थापन परिषदेने याबाबत केलेल्या ठरावालाही विद्यापीठ प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीच्या जाहिराती संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाव्यात, असा ठराव मार्च २०१४ मध्ये करण्यात आला. त्याला आठ महिने उलटले तरी त्याची अंमलबजावणी करण्यास विद्यापीठ प्रशासन टाळाटाळ करीत आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीच्या जाहिरातींची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने इच्छुक पात्र उमेदवारांना त्याचा खूप फायदा होऊ शकेल. जाहिराती महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदाची जागा रिक्त झाल्यानंतर ते पद भरण्याकरिता महाविद्यालयाच्या व्यवस्थापनास विद्यापीठाकडून मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे संलग्न महाविद्यालयांमध्ये भरल्या जात असलेल्या पदांची सर्व माहिती विद्यापीठाकडे असते. ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे एवढेच काम विद्यापीठाला करायचे आहे. सेट/नेट पात्रताधारक अनेक विद्यार्थी दररोज वर्तमानपत्रांमधून प्राध्यापक पदाच्या जाहिराती तपासत असतात. पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील इतर विद्यापीठांच्या जाहिराती त्यांना संकेतस्थळावरच पाहायला मिळतात. पुणे विद्यापीठाच्या जागांची माहिती मिळविण्यासाठी मात्र त्यांना जंगजंग पछाडावे लागत आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संकेतस्थळावर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने प्राध्यापक भरतीची सविस्तर माहिती दिली जाते. पुणे विद्यापीठ मात्र यामागे खूपच मागे आहे. (प्रतिनिधी)
प्राध्यापक भरतीची माहिती प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ
By admin | Updated: November 10, 2014 05:10 IST