बोगस दंत तंत्रज्ञांवर कारवाईस टाळाटाळ
By Admin | Updated: July 8, 2015 02:43 IST2015-07-08T02:43:45+5:302015-07-08T02:43:45+5:30
: हलक्या दर्जाचे साहित्य वापरून निकृष्ट दर्जाचे दात, कवळ्या बनवून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस दंत तंत्रज्ञांचा पुण्यात सुळसुळाट झालेला असताना

बोगस दंत तंत्रज्ञांवर कारवाईस टाळाटाळ
पुणे : हलक्या दर्जाचे साहित्य वापरून निकृष्ट दर्जाचे दात, कवळ्या बनवून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस दंत तंत्रज्ञांचा पुण्यात सुळसुळाट झालेला असताना, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पुणे महापालिकेला नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील अशा बोगस तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र दंत परिषदेला असतानाही ते कारवाई करण्यास चालढकल करीत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात सुमारे २५० तर संपूर्ण राज्यात सुमारे साडेतीन हजार बोगस दंत तंत्रज्ञ असल्याचे महाराष्ट्र डेंटल मेकॅनिक्स असोसिएशनने जाहीर केले होते. त्याबाबत महाराष्ट्र दंत परिषदेकडे त्यांनी अनेकदा तक्रारही केली होती. मात्र त्याकडे परिषदेने अनेकदा काणाडोळा केला होता. शेवटी परिषदेने पुणे महापालिकेसह राज्यातील विविध महापालिकांना असोसिएशनची तक्रार आणि त्यांनी दिलेल्या बोगस दंत तंत्रज्ञांची यादी पाठविली होती आणि त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
हा आदेश पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाला. त्यानंतर अशा बोगस दंत तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे अधिकार पुणे महापालिकेला कायद्याने दिले आहेत का, अशी विचारणा आरोग्य विभागाने विधी विभागाला केली होती. विधी विभागाने, बोगस दंत तंत्रज्ञ हे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायद्याअंतर्गत येत नाहीत. त्यामुळे महापालिकेला अशा बोगस दंत तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. अशा बोगस तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र दंत परिषदेला आहेत, असे पत्र पाठवून स्पष्ट केले आहे.