पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न, महसूल, पोलीस प्रशासनाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:41+5:302021-07-07T04:12:41+5:30
राजगुरुनगर: खेड तालुक्यात १२ गावांतून जाणाऱ्या रिंगरोडला विरोध करण्यासाठी आणि आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार ...

पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न, महसूल, पोलीस प्रशासनाची धावपळ
राजगुरुनगर: खेड तालुक्यात १२ गावांतून जाणाऱ्या रिंगरोडला विरोध करण्यासाठी आणि आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने पहाटे ६ वाजता रिंगरोड व पुणे- नाशिक रेल्वेविरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरुनगर येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. अखेर प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण स्वःता टाकीजवळ येऊन
तुमच्या मागण्या वरिष्ठांकडे पोहोचवून न्याय देऊ, असे सांगितल्यानंतरच पाटीलबुवा गवारी टाकीवरून ४ तासाने खाली उतरले.
तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या बारा गावांनी तीव्र विरोध केला असून, खेड प्रांत कार्यालयासमोर गेली नऊ दिवसांपासून "ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषण" सुरू आहे. मात्र, प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही. त्यामुळे समितीने आंदोलन तीव्र केले. आज दि. ६ रोजी रिंगरोड व पुणे-नाशिक रेल्वेविरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी प्रांत कार्यालयासमोरील उंच पाण्याच्या टाकीवर चढून या जीवघेण्या आंदोलनाने महसूल विभाग, पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली. पोलीस अटकाव करतील म्हणून पाटीलबुवा गवारी हे पहाटे अंधारात येऊन टाकीवर चढून बसले. सकाळ झाल्यावर त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान, राजगुरुनगर शहरातील नागरिकांनी आंदोलनस्थळी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही खाली येण्यासाठी सांगूनही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, संदीप भापकर यांनी पाटीलबुवा गवारी यांना टाकीवरून खाली उतरण्यासाठी विनंती केली. मात्र, त्यांनी ऐकले नाही. जो पर्यंत सरकार यात लक्ष घालत नाही, रिंगरोड रद्द करत नाही. तसे लेखी देत नाहीत तोपर्यंत खाली येणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे प्रशासन खडबडून जागे होऊन, तर त्यांना खाली येण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, ते खाली न येता प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत होते. अखेर प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते, महसूल विभागाचे पदाधिकारी टाकीच्या खाली येऊन पाटीलबुवा गवारी तुम्ही खाली या, तुमच्या मागण्या लेखी स्वरूपात वरिष्ठांकडे पोहोचविल्या जातील. असे सांगितल्यावर गवारी टाकीवरून खाली उतरले. आज सकाळपासून पाटीलबुवा गवारी टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी करीत होते. त्यामुळे पाण्याच्या टाकीलगत वाडारोड, कोर्टरोड या रोड या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.
रिंगरोड व रेल्वेविरोधात पाटीलबुवा गवारी यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन केले.