शिक्रापूर : येथील एकाला पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत नंतर त्या ठिकाणी बोगस पोलिसांनी धाड टाकून पैसे जप्त करत पलायन केले. मात्र नागरिकांनी पाठलाग करत तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.विश्वास भगवान घाग (वय ५३, रा. कल्याण ठाणे),नीलेश ओमप्रकाश सावंत (वय ५३, रा. डोंबिवली पूर्व ठाणे), बशीर इब्राहीम शेख (रा. कासरा ठाणे), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिक्रापूर येथील संतोष भुजबळ याला तिघांनी पैशाचा पाऊस पाडतो, असे म्हणून विश्वासात घेऊन आळेफाटा येथे बोलावून घेत पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यांनतर चौघे शिक्रापूर येथे आले. त्यांनी बुधे वस्ती येथे एका घरात तिघांनी बसून पाच लाख रुपये तसेच काही वस्तू ठेवत विधी सुरू केला. याचवेळी पोलिसांच्या वेशातील एका तोतया पोलिसासह तिघांनी घटनास्थळी धाड टाकत आम्ही पोलीस आहे, जादूटोणा करता का, पैशांचा पाऊस पाडता का, असे म्हणून पैसे आणि तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील कारमधून पलायन केले. त्यांनतर फसवणूक झालेल्या युवकाच्या मित्रांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करीत चाकण गाठले.चाकणमध्ये त्यांची कार अडवली असता त्यांची झटापट सुरू होऊन तिघेजण पैसे घेऊन पळून गेले. त्यांनतर चाकण येथील म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास घाडगे, अमोल माटे यांनी तिघांना ताब्यात घेऊन घटनाक्रम समजावून घेत तिघांना शिक्रापूर पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार हवलदार अमोल नलगे, राकेश मळेकर, नवनाथ केंद्रे यांनी तिघांना ताब्यात घेत आळेफाटा पोलिस स्टेशन येथे घेऊन जात त्यांना आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले.
'आम्ही पोलीस आहोत..' बोगस पोलिसांकडून धाड टाकून लुटण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:29 IST