पुणे : पौड रोड येथील जय भवानीनगर परिसरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने साथीदारांना सोबत घेऊन धुडगूस घालत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच चाळीत पार्किंग केलेल्या वाहनांना ढकलून देत नुकसान केले. यावेळी त्यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २१) रात्री बाराच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार पौड रोड येथील जय भवानीनगर येथील चाळ नंबर १ मध्ये ५ ते ६ जणांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पार्किंग केलेल्या चार-पाच वाहनांना लाथा मारल्या. तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन हे कृत्य केल्याचे समजले. हा प्रकार घडल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक, महिला तक्रार देण्यासाठी किष्किंधानगर पोलिस चौकीला गेले होते.
संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. मात्र, गाड्यांची तोडफोड परिसरात झालेली नाही. - संदीप देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे आमच्या मुलांचे इतर कोणासोबत काही भांडण नसताना त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच आमच्या गाड्या पाडून देण्यात असून, आम्हाला जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे. - आशा कदम, स्थानिक रहिवासी