ATS action in Pune | स्थानिक तरुणांना अतिरेकी कारवायात सहभागी करून घेण्यापूर्वीच जुनेद जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 14:21 IST2022-05-24T13:38:28+5:302022-05-24T14:21:33+5:30
जुनेदच्या बँक खात्यावर अतिरेकी कारवायांसाठी पैसे जमा...

ATS action in Pune | स्थानिक तरुणांना अतिरेकी कारवायात सहभागी करून घेण्यापूर्वीच जुनेद जेरबंद
पुणे : लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला एटीएसने पुण्यातून अटक केली आहे. ही कारवाई पुण्यातील दापोडी परिसरात केली गेली आहे. या कारवाईत अटक केलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद जुनेद आहे. तो एका मदरशाजवळ राहत होता. लष्कर ए तोयबाच्या जम्मू येथील आफताब शहा आणि उमर या दोघांच्या संपर्कात तो होता. या दोघांकडून त्याच्या बँक खात्यावर अतिरेकी कारवायांसाठी पैसे जमा झाले होते.
अतिरेकी संघटनेसाठी तरुण मुलांची भरती करणे आणि दारूगोळा आणि शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्याला फंडिंग केली जात होती. दापोडी परिसरातील एका मदरशाजवळ तो भाड्याच्या घरात राहत होता. या परिसरातील काही स्थानिक तरुणांच्या संपर्कातही जुनेद होता. स्थानिक तरुणांना अतिरेकी कारवायात सहभागी करून घेण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. त्याच्या संपर्कात असलेल्या काही तरुणांनी देश सोडला असल्याचीही माहिती समोर येत आहे.
काल दुपारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर जुनेद चौकशीत दोषी आढळल्याने रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहे. हा मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. जुनेदचे शिक्षण मदरशात झालं आहे.
लष्कर-ए-तैयबा-
लष्कर-ए-तैयबा ही दक्षिण आशियामधील एक मोठी आणि सर्वांत कार्यरत इस्लामी मूलतत्त्ववादी व दहशवादी संघटना आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांत या संघटनेवर बंदी आहे.