एटीएम सेंटर लुटणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:55+5:302021-03-09T04:12:55+5:30
मंचर: शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमधील राेकड चोरणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात मंचर पोलिसांना यश मिळाले आहे. राजस्थान ...

एटीएम सेंटर लुटणारी टोळी गजाआड
मंचर: शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमधील राेकड चोरणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात मंचर पोलिसांना यश मिळाले आहे. राजस्थान पोलिसांच्या मदतीने अलवर जिल्ह्यातील लक्ष्मण गड येथे या चोरट्यांना मंचर पोलिसांनी अटक केली.
अन्वर अमली खा (वय २५ रा. भंगू ता.तावडू हरियाणा), मुस्तफा मोहम्मद मेव (वय २३ रा. माचरोली ता.नूह हरियाणा), तालीम आलीम मेव (वय २६ रा. दौहज ता.दौहज हरियाणा), इर्षद खुर्शिद मेव (वय २५ रा. पाली ता.गोपाळगड जिल्हा भरतपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम सेंटरवर दि. २९ जानेवारी पहाटे चोरट्यांनी डल्ला मारला. सीडीएम मशीन पळवून नेऊन त्यात असणाऱ्या १८ लाख ५३ हजार रोख व ५० हजार रुपये किमतीचे सीडीएम मशीन चोरट्यांनी चोरून नेले होते. तपासामध्ये ही चोरटी परराज्यातील टोळीकडून करण्यात आल्याचे धागेदाेरे मंचर पोलिसांच्या हाती लागले होते. त्याअनुषंगाने तपास करत असताना उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी एक पथक तयार केले. दरम्यान, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील लक्ष्मण गड येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलीस नाईक विलास साबळे,पोलीस नाईक राजेंद्र हिले, विठ्ठल वाघ,महेश भालेकर,अमर वंजारी,अंकुश मिसाळ, शांताराम सांगडे या पथकाला राजस्थानला रवाना केले. पथकाने राजस्थान पोलिसांच्या मदतीने या चोरट्यांना ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात या चोरट्यांनी मंचर येथील एटीएम सेंटरची चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, या टोळीकडून अन्य चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
आरोपींसमवेत मंचर पोलिसांचे पथक
०८ मंचर एटीएम चोरी